Gutkha Raid: घराच्या चार भिंतीत छुप्या पद्धतीने मानवी आरोग्याशी खेळ छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू होता. चिकलठाणा पोलिसांच्या एका छाप्यामुळे गेवराई तांड्यात असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात अवैध धंद्यांना ऊत आलाय. त्यामुळेच पोलिसांनी आता थेट कारवाईचा बडगा उगारलाय. सोमवारी, २४ ऑगस्टला रात्री साडेआठच्या सुमारास पोलिसांच्या एका विशेष पथकाने गेवराई तांड्यातील एका घरावर अचानक धाड टाकली.
गेवराई तांड्यात सापडला अवैध गुटख्याचा साठा
पोलीस हवालदार परमेश्वर आढे, उपनिरीक्षक राठोड, नागरगोजे आणि शिपाई उबाळे यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती. गोकुळ भानुदास राठोड (वय ३५) याने स्वतःच्या घरात बंदी घातलेल्या गुटख्याचा साठा केल्याची ती पक्की खबर होती. दोन पंचांना सोबत घेत पोलिसांनी थेट गोकुळचं घर गाठलं.
घराची झडती सुरू झाली. धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या. तब्बल ३७ हजार ६० रुपये किमतीचा विविध कंपन्यांचा गुटखा आणि सुगंधित तंबाखू तिथे लपवून ठेवण्यात आला होता. यात विमल, राजनिवास, रजनीगंधा आणि तुलसी यांसारख्या ब्रँडच्या पुड्या होत्या. सोबतच ४,८०० रुपयांचा ‘केएम ०१ जाफरानी जर्दा’ देखील सापडला. अधिक आर्थिक फायद्यासाठी हा गोरखधंदा सुरू होता.
पोलिसांनी घटनास्थळीच सर्व मुद्देमाल जप्त केला. प्रत्येक ब्रँडचे सॅम्पल सीए तपासणीसाठी स्वतंत्रपणे सील करण्यात आले. विशेष म्हणजे, छापा २४ तारखेला पडला असला तरी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून चार दिवसांनी, म्हणजेच २८ ऑगस्टला या प्रकरणात अधिकृतपणे गुन्हा दाखल करण्यात आला.
अन्न सुरक्षा कायदा (कलम ५९) आणि भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १२३, २२३, २७४ आणि २७५ अंतर्गत ही भक्कम कारवाई करण्यात आली आहे. आता पोलीस हवालदार निवृत्ती मदने यांच्याकडे या प्रकरणाचा पुढील तपास सोपवण्यात आला आहे. यामागे आणखी कुणाचं मोठं रॅकेट आहे का? याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- शिवसेना पक्ष-चिन्हाचा तिढा निर्णायक वळणावर; आजपासून शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
- OBC मंत्र्यांचा सरकारविरोधात एल्गार; भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बैठकीतून सभात्याग
- ‘सकाळपर्यंत उत्तर द्या…’; विखे पाटलांचा जरांगेंना नवा प्रस्ताव, मध्यरात्री नेमकं काय शिजलं?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











