पैठण | किरण काळे पाटील: खाकी वर्दी अंगावर चढवून कायद्याचे रक्षण करण्याची शपथ घेतलेलाच जर कायद्याची लक्तरे वेशीवर टांगू लागला, तर सर्वसामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा? असाच एक धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर ग्रामीण हद्दीत समोर आला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या नात्यातीलच एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले आणि तिच्यावर वारंवार बळजबरीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध अपहरण, बलात्कार आणि पोक्सो (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिडकीन हॉस्टेलवरून पळवले; लॉजवर नेऊन अत्याचार
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन तरुणी बिडकीन येथील एका अकॅडमीच्या हॉस्टेलमध्ये राहून पोलीस भरतीची तयारी करत होती. २६ मे २०२६ च्या रात्री आरोपी अशपाक फिरोज शेख (वय २१, रा. खादगाव, ता. पैठण; सध्या नेमणूक चाकण पोलीस ठाणे, पिंपरी-चिंचवड) हा पुण्यातून चारचाकी वाहनाने बिडकीन येथे आला. त्याने पीडितेला फोन करून हॉस्टेलबाहेर बोलावून घेतले.
परत सोडताना हॉस्टेलबाहेरील काही मुलांनी जाब विचारत गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने तिथून पळ काढत आडूळ मार्गाने संभाजीनगर रस्त्यावरील एका लॉजवर नेऊन तिच्यावर पहिल्यांदा बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले.
त्यानंतर नातेवाइकांना समजल्यावर आरोपीने ‘मुलगी १८ वर्षांची झाल्यावर लग्न करेन’ असा बॉन्ड लिहून दिला. तिच्या शिक्षणाचा खर्च करतो असे सांगून तिला चाकण (पुणे) येथे भाड्याच्या खोलीवर नेले. तिथे सलग तीन महिने लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार अत्याचार केले.
शेवटी २४ ऑगस्ट रोजी वडिलांचे आजारपण दाखवून तिला घरी आणून सोडले आणि फसवणूक केली. अखेर पीडितेने सर्व प्रकार घरच्यांना सांगून बिडकीन ठाण्यात फिर्याद दिली.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १३७(२), ६४(२)(m), ६९, ८७ आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायद्याच्या कलम ४ व ६ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस उपनिरीक्षक संभाजी झिंझुर्डे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- Maharashtra Weather Update: 2 ते 5 सप्टेंबरदरम्यान जोरदार पावसाचा अंदाज; विदर्भातील जिल्ह्यांना अलर्ट
- 2030 पर्यंत पेट्रोल-डिझेलची 50 टक्के गरज शेतकरी भागवेल – देवेंद्र फडणवीस
- ‘पुणेकरांनी या वादात न पडता उत्सव साजरा करा’; DJच्या मुद्द्यावर फडणवीसांचं आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











