🕒 1 min read
दिल्ली – सोशल मीडियावर सातत्याने विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला अखेर दिल्ली पोलिसांनी हिरवा कंदील दाखवला आहे. संस्थापक अभिजीत दिपके यांनी भारतात पाऊल ठेवताच त्यांच्या संघटनेला हे पहिले मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी आज, ६ जून रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत जंतरमंतरवर शांततापूर्ण आंदोलनासाठी अधिकृत परवानगी दिली आहे. स्वतः दिपके यांनी एक्सवरून (ट्विटर) याबाबतची माहिती देत समर्थकांना शांततेचे आवाहन केले.
अभिजीत दिपके दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे, विमानतळाबाहेर येताना त्यांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक स्पष्टपणे दिसत होते. सुरक्षेचे कारण देत दिल्ली पोलिसांनी त्यांना कडेकोट बंदोबस्तात एका खाजगी वाहनाने तेथून सुरक्षित स्थळी नेले.
आता या संपूर्ण आंदोलनाकडे देशाचे लक्ष लागले आहे. देशातील विविध परीक्षांमधील गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या मुद्द्यांवरून थेट केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी ‘कॉकरोच जनता पार्टी’ने केली आहे. विद्यार्थ्यांनी संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर गर्दी न करता थेट जंतरमंतरवर लोकशाही मार्गाने एकत्र यावे, असे आवाहन दिपके (Abhijit Dipke) यांनी केले आहे.
दुसरीकडे, देशभरातून विद्यार्थी आणि कोचिंग क्लासचे तरुण मोठ्या संख्येने दिल्लीत धडकण्याची शक्यता असल्याने सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या आहेत. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संपूर्ण नवी दिल्ली जिल्ह्याची १२ झोनमध्ये विभागणी करण्यात आली असून तब्बल दोन हजारांहून अधिक जवान रस्त्यावर उतरले आहेत.
खबरदारीचा उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि स्वतः शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. जंतरमंतरकडे जाणाऱ्या सर्वच प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेडिंग करून वाहनांची कसून तपासणी केली जात असून, दिल्लीचे राजकीय वातावरण आता चांगलंच तापलं आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- फडणवीस सरकारचा मोठा निर्णय: मराठा समाजाला आता ओबीसींप्रमाणे मिळणार ‘या’ ८ योजनांचा थेट लाभ
- के. अण्णामलाईंचा भाजपला अखेर रामराम! नव्या पक्षाची घोषणा करत हायकमांडबाबत केला मोठा गौप्यस्फोट
- NEET Paper Leak: मनीषा वाघमारे ब्यूटी पार्लर चालवते की पेपर फोडते? सीबीआयचा कोर्टात मोठा गौप्यस्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












