प्रतिनिधी, 21 नोव्हेंबर: भारताचा माजी टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवने २०२७ साठी आपली मोठी इच्छा व्यक्त केली असून, आगामी आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळवून देण्याचे आपले सर्वात मोठे लक्ष्य असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. हार्दिक पंड्याला नुकतेच पंजाब किंग्सकडे ट्रेड करण्यात आल्यानंतर आणि मुंबई इंडियन्स आयपीएल २०२७ पूर्वी नव्या कर्णधाराच्या शोधात असताना सूर्यकुमारचे हे विधान समोर आले आहे.
उजव्या हाताचा फलंदाज असलेला सूर्यकुमार यावेळी म्हणाला, “२०२७… मला वाटतं २०२७ मध्ये आयपीएल स्पर्धा येत आहे, जी आता लगेच होणारी स्पर्धा आहे. त्यामुळे मला ती स्पर्धा मुंबई इंडियन्ससाठी जिंकायची आहे.” मुंबई इंडियन्सने नुकतेच माजी कर्णधार हार्दिक पंड्याला अर्शदीप सिंगच्या बदल्यात पंजाब किंग्सकडे ट्रेड केले आहे. फ्रँचायझीने अद्याप आपला नवा कर्णधार जाहीर केलेला नाही, मात्र या पदासाठी सूर्यकुमार, रोहित शर्मा आणि तिलक वर्मा यांच्या नावांची चर्चा आहे. पुढील हंगामासाठी खेळाडूंना कायम ठेवल्यानंतर, मुंबई इंडियन्स आता १६ डिसेंबर रोजी गोव्यात होणाऱ्या आयपीएल २०२७ च्या मिनी लिलावाची तयारी करत आहे.
आयपीएलच्या योजनांशिवाय, सूर्यकुमारने नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ६ नोव्हेंबर रोजी झालेल्या भेटीचा अनुभवही शेअर केला. याच कार्यक्रमात सूर्यकुमारला ‘आऊटस्टँडिंग अचिव्हमेंट अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. खराब टप्प्यातून गेल्यानंतर या भेटीमुळेच आपले नशीब उजळले आणि आपण पुन्हा धावा करू लागल्याची भावना त्याने व्यक्त केली.
शुक्रवारी, ६ नोव्हेंबर रोजी सूर्यकुमारने आपली पत्नी देविशा शेट्टी, मे २०२६ मध्ये जन्मलेली मुलगी रिद्धिमा, तसेच मेहुणा, मेहुणी आणि त्यांच्या मुलांसह नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली होती. ही भेट केवळ ५-१० मिनिटे चालेल अशी सूर्यकुमारला अपेक्षा होती, मात्र पंतप्रधानांनी त्यांच्यासोबत ४०-४५ मिनिटे घालवली.
तो म्हणाला, “मला वाटतं ती भेट खूप भाग्यवान ठरली. मी पुन्हा धावा करायला सुरुवात केली. ती एक अतिशय उत्तम भेट होती. आम्हाला वाटलेलं की ही भेट फक्त ५ किंवा १० मिनिटांची असेल, पण त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला सुमारे ४०-४५ मिनिटे दिली. त्यामुळे तो एक अतिशय सुंदर क्षण होता.”
या संवादादरम्यान सूर्यकुमारने पंतप्रधानांना ते एवढ्या जबाबदाऱ्या सांभाळताना दबाव कसा हाताळतात, याबाबतही विचारणा केली. माजी कर्णधार पुढे म्हणाला, “मी त्यांच्याशी ते या सर्व परिस्थिती कशा हाताळतात यावर बोललो. म्हणजे, आम्ही हा खेळ खेळतो आणि आम्हाला दडपण जाणवतं, पण एवढ्या सर्व परिस्थिती हाताळताना तुम्ही दडपणाखाली कसे काम करता, असं मी त्यांना विचारलं. त्यांनी सर्व प्रश्नांची अतिशय छान उत्तरे दिली. तो अतिशय हलकाफुलका क्षण होता.”
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘अकवान’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह ८ राज्यांत पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अलर्ट
- मोदी मंत्रिमंडळाचा २३ नोव्हेंबरला विस्तार होण्याची शक्यता; शमिक भट्टाचार्य यांच्यासह बड्या नेत्यांना संधीची चर्चा
- शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचे मोठे विधान; फेब्रुवारीत निकालाची शक्यता








