प्रतिनिधी, 21 नोव्हेंबर: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) शनिवारी, २१ नोव्हेंबरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटसाठी आपल्या केंद्रीय करारातील खेळाडूंची नवी यादी जाहीर केली आहे. या नव्या यादीत अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान आणि सलामीवीर इमाम-उल-हक यांना वगळण्यात आल्याची सर्वात मोठी बाब समोर आली आहे.
पीसीबीने यावेळी फॉरमॅटनुसार खेळाडूंच्या करारांची रचना केली आहे. हा केंद्रीय करार पाच वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागण्यात आला आहे. यामध्ये ‘कसोटी आणि वनडे’, ‘कसोटी’, ‘वनडे आणि टी-२०’, ‘टी-२०’ तसेच ‘डेव्हलपमेंट’ या श्रेणींचा समावेश आहे. पाकिस्तानचा स्टार खेळाडू बाबर आझम आणि सलमान अली आघा यांना ‘कसोटी आणि वनडे’ या श्रेणीत स्थान देण्यात आले आहे.
रिझवान आणि इमाम या दोन वरिष्ठ क्रिकेटपटूंचा बोर्डाने जाहीर केलेल्या एकाही श्रेणीत समावेश केलेला नाही. इंग्लंडमधील कसोटी मालिकेच्या मध्यावर या दोघांना वगळण्यात आले होते. तेव्हापासूनच पाकिस्तानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघातील त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कराराच्या ‘कसोटी’ श्रेणीत अझान अवैस, मोहम्मद अब्बास, साजिद खान आणि सौद शकील यांचा समावेश आहे. तर, ‘वनडे आणि टी-२०’ श्रेणीत अबरार अहमद, अराफत मिन्हास, फखर झमान, फहीम अश्रफ, हरिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी यांना करारबद्ध करण्यात आले आहे. तसेच, ‘टी-२०’ श्रेणीमध्ये हसन नवाज, माझ सदाकत, मोहम्मद सलमान मिर्झा, नसीम शाह, साहिबजादा फरहान, शादाब खान आणि उस्मान तारिक यांना जागा मिळाली आहे.
युवा खेळाडूंसाठी असलेल्या ‘डेव्हलपमेंट’ श्रेणीत अब्दुल समद, अली रझा, मोहम्मद ताहा, मोहम्मद इम्रान रंधावा, साद मसूद, शाहजेब खान, उबेद शाह, अब्दुल्ला फजल, फरहान युसूफ, मोहम्मद तय्यब आरिफ, रजाउल्ला, समीर मिन्हास, शमिल हुसैन, अहमद दानियाल, हुनैन शाह, मोहम्मद गाझी घोरी, साद बेग, साकिब खान आणि सुफयान मोकीम या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- शुबमन गिलच्या वादग्रस्त LBW निर्णयावरून न्यूझीलंडचे खेळाडू नाराज, ऋषभ पंतने दिले सडेतोड उत्तर
- अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानातून रोहित पवारांचाही प्रवास; नवनाथ बन यांचा खळबळजनक आरोप
- हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील दोन स्थानकांचे काम पूर्ण; डिसेंबरमध्ये प्रवाशांसाठी खुली होण्याची शक्यता








