प्रतिनिधी, 19 ऑक्टोबर: कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील 'राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी'ने आवश्यक जादुई आकडा गाठून सत्तांतरावर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र, हा निकाल फिरवण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचा खळबळजनक आरोप आमदार रोहित पवार यांनी केला असून, या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
गोकुळच्या एकूण २५ जागांसाठी ही निवडणूक पार पडली. सत्ता मिळवण्यासाठी १३ या जादुई आकड्याची आवश्यकता होती. सुरुवातीला सतेज पाटील यांच्या पॅनेलला १४ जागांवर आघाडी मिळाली होती. मात्र, एका जागेवर झालेल्या फेरमतमोजणीत सतेज पाटील गटाचे सचिन घोरपडे यांचा पराभव झाला आणि महायुतीच्या 'राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी'चे अमर पाटील विजयी झाले. यामुळे सतेज पाटील यांच्या विजयी उमेदवारांची संख्या १३ वर आली, तर महायुतीच्या जागा १२ झाल्या.
या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी 'एक्स' (X) या समाजमाध्यमावर पोस्ट करत महाविकास आघाडीच्या आक्रमक भूमिकेला बळ दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'गोकुळ दूधसंघाच्या बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीचा कौल क्लिअर आहे. पण आता खरा सत्तेचा दुरुपयोग सुरु झाल्याचं कळतंय.' विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र न देता फेरमतमोजणीच्या माध्यमातून अपेक्षित निकाल फिरवण्यासाठी सूत्रे हलवली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
याचबरोबर रोहित पवार यांनी थेट इशाराही दिला आहे. 'जर का निकाल चोरण्याचा प्रयत्न केला तर गाठ प्रामाणिक सभासदांशी आहे. नेत्यांनाही आणि पिलावळींनाही घराबाहेर पडू देणार नाहीत,' अशा शब्दांत त्यांनी सुनावले आहे. दरम्यान, महायुतीच्या आणखी तीन उमेदवारांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज दाखल केल्यामुळे तणाव वाढला आहे. निकालात काही बदल झाल्यास पुढील पावले उचलण्यासाठी आता वकिलांची फौज पाचारण करण्यात आली असून कायदेशीर बाजूंवर खलबते सुरू झाली आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- मका साठेबाजांवर करडी नजर ठेवणार, पोल्ट्री उद्योगालाही दिलासा देणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी १८२ उमेदवार रिंगणात, २३ ऑक्टोबरला मतदान
- टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण: तीनही आरोपी सज्ञान; बिश्नोई गँगच्या व्हायरल ऑडिओबाबत पोलिसांनी दिली माहिती
Quick Answers
गोकुळ दूध संघाच्या एकूण २५ जागांसाठी निवडणूक पार पडली आणि सत्ता मिळवण्यासाठी १३ या जादुई आकड्याची आवश्यकता होती.
एका जागेवर झालेल्या फेरमतमोजणीत सतेज पाटील गटाचे सचिन घोरपडे यांचा पराभव झाला आणि महायुतीचे अमर पाटील विजयी झाले.
विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र न देता फेरमतमोजणीच्या माध्यमातून निकाल फिरवण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
निकालात काही बदल झाल्यास पुढील पावले उचलण्यासाठी वकिलांची फौज पाचारण करण्यात आली असून कायदेशीर बाजूंवर खलबते सुरू झाली आहेत.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






