Ganja Seized: छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा कमंगर गावातून एक चक्रावून टाकणारा प्रकार समोर आला आहे. घरात बंद दरवाजाआड गांजाची मोठी तस्करी सुरू होती. स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका मोठ्या कारवाईत तब्बल एक लाखाचा गांजा जप्त केलाय. सचिन विष्णू डोंगरे (वय ३५) असं या तस्कराचं नाव. धक्कादायक म्हणजे, ज्या घरातून हा काळाबाजार चालायचा, ते घर त्याच्या आईच्या नावावर आहे.
शेंद्रा गावात गांजा तस्करी
झालं असं की, २८ ऑगस्टला पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे आणि त्यांचं पथक चिकलठाणा हद्दीत घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत होते. त्याचवेळी गुप्त बातमीदाराने सचिन डोंगरेच्या अवैध धंद्याची पक्की टीप दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीची खातरजमा झाली. वरिष्ठांची परवानगी मिळाली आणि कारवाईचं चक्र फिरलं.
पोलिसांचा ताफा थेट शेंद्रा गावात पोहोचला. सोबत नायब तहसीलदार परेश चौधरी, फॉरेन्सिक टीमचे (FSL) संदीप ठाकर आणि इलेक्ट्रॉनिक वजनकाटा घेऊन आलेले रेशन दुकानदार साळुबा कचकुरे होते. कारवाईला जाताना एक अनपेक्षित अडचण आली. कॅम्ब्रीज चौकात एका पंचाची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे पुढील प्रक्रियेसाठी स्थानिक पोलीस पाटील अफसर पठाण यांच्याकडे पंचाची जबाबदारी देण्यात आली.
रात्री पावणेआठच्या सुमारास पोलिसांनी डोंगरेच्या दोन मजली घराची झडती सुरू केली. हॉलमध्ये लाकडी टीपॉयवर एक पांढरी पिशवी ठेवलेली होती. उग्र वास येत होता. पिशवी उघडली आणि आत हिरवट, काळपट रंगाचा गांजा सापडला. जागेवरच वजन केलं. तो तब्बल २ किलो ४७ ग्रॅम भरला. बाजारात याची अंदाजे किंमत १ लाख २ हजार ३५० रुपये इतकी आहे.
हा गांजा एका अनोळखी ट्रकवाल्याने आणून दिल्याचं आरोपीने चौकशीत सांगितलं. मध्यरात्रीनंतर त्याच्यावर NDPS कायदा कलम ८(क) आणि २०(ब)(ii)(ब) अंतर्गत चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास पीएसआय श्रीनिवास धुळे करत आहेत. या धडक कारवाईत पीएसआय घुगे यांच्यासोबत महिला हवालदार सरला जाधव, डोके, राठोड, गोरे, खरात आणि चालक बिरुटे यांचाही सहभाग होता.
📌 महत्वाच्या बातम्या
- गेवराई तांड्यात पोलिसांची मोठी धाड; घरात लपवलेला गुटख्याचा साठा उघडकीस
- शिवसेना पक्ष-चिन्हाचा तिढा निर्णायक वळणावर; आजपासून शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
- OBC मंत्र्यांचा सरकारविरोधात एल्गार; भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बैठकीतून सभात्याग
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











