पुणे, २५ नोव्हेंबर: शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ बाहेर बुधवारी भरदुपारी झालेल्या गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने वेगाने तपास करत ५ आरोपींना अटक केली आहे. या जीवघेण्या हल्ल्याचा कट रचणारे अक्षय चव्हाण आणि अमोल चव्हाण या दोन मुख्य सूत्रधारांना पुण्यातूनच ताब्यात घेण्यात आले आहे.
गुन्ह्याला प्रत्यक्ष अंजाम दिल्यानंतर पसार झालेल्या ३ हल्लेखोरांना दौंड परिसरातून पकडण्यात आले आहे. हे आरोपी दौंडमार्गे सोलापूरच्या दिशेने पळ काढण्याच्या प्रयत्नात होते. पोलिसांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे मार्गावरील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क केले आणि नाकाबंदी करून या तिघांच्या मुसक्या आवळल्या.
कात्रज परिसरात राहणारा मंदार किवळे हा बुधवारी दुपारी सव्वाच्या सुमारास न्यायालयातील सुनावणी आटोपून बाहेर आला होता. त्यावेळी दोन दुचाकींवरून आलेल्या ६ हल्लेखोरांनी त्याला गेट क्रमांक ४ जवळ घेरले. हल्लेखोरांनी सुरुवातीला त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर कोयत्याने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले.
या रक्तरंजित हल्ल्यात जखमी झालेल्या मंदार किवळेवर सध्या ससून रुग्णालयात तातडीने उपचार सुरू आहेत. मंदार हा २०२५ मध्ये झालेल्या शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी असून तो नुकताच जामिनावर बाहेर आला होता. याच हत्येचा बदला घेण्यासाठी त्याच्यावर हा हल्ला झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची ८ ते १० विशेष पथके तैनात करण्यात आली होती. अवघ्या काही तासांत पोलिसांनी या आरोपींना बेड्या ठोकल्या असून, दौंडमध्ये पकडलेल्या आरोपींना पुढील सखोल चौकशीसाठी पुण्यात आणले जात आहे. मात्र, न्यायालयासारख्या अतिसंवेदनशील भागात शस्त्रे घेऊन येण्याची हिंमत गुन्हेगारांमध्ये कशी निर्माण होते, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.





