प्रतिनिधी, २५ नोव्हेंबर: पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर मंदार किवळे यांच्यावर झालेल्या गोळीबार आणि कोयता हल्ल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी दौंड परिसरातून ५ आरोपींना ताब्यात घेतले असून, यात ३ मुख्य हल्लेखोर आणि २ संशयितांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंदार किवळे हे ०४ दिवसांपूर्वीच कारागृहातून जामिनावर बाहेर आले होते. शिवाजीनगर न्यायालयाबाहेर त्यांच्यावर अचानक गोळीबार करण्यात आला आणि कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
जमिनीच्या वादातून मंदारने शुभम चव्हाण याची हत्या केल्याचा आरोप आहे. याच हत्येचा बदला घेण्यासाठी शुभमचा भाऊ अक्षय चव्हाण याने हा हल्ला घडवून आणल्याचा पोलिसांना संशय आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची सखोल चौकशी सुरू केली आहे. तसेच, हल्लेखोरांनी गुन्ह्यासाठी वापरलेली स्कूटरही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.






