पाचोडमध्ये पोलिसांचा सायरन फिका, एकाच रात्री तिहेरी चोरी; भुमरेंच्या बालेकिल्ल्यात कायदा वाऱ्यावर?

सहा दिवसांत महसूल अधिकाऱ्याला धक्काबुक्की, पोलिसांच्या सायरनला न जुमानता राडा आणि तिहेरी चोरी घडली. अवैध मुरूम-वाळू तस्करीकडे खासदार-आमदारांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

Published On: 

Pachod Crime News: Burgled generic medical store near Pachod bus stand amid rising thefts and lawlessness in Paithan

पाचोड, 25 नोव्हेंबर | किरण काळे पाटील : पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या सहा दिवसांत कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांची जमावबंदी लागू असताना खुद्द ठाणे प्रभारी अधिकाऱ्यासमोर आणि शासकीय वाहनाचा सायरन वाजत असताना दोन गटांत झालेली हाणामारी, त्यानंतर एकाच रात्री झालेली तिहेरी चोरी आणि विनाक्रमांकाच्या वाहनांतून बिनधास्त सुरू असलेली अवैध मुरूम-वाळू वाहतूक यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांचा राजकीय बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या भागात नेमके चाललेय तरी काय, असा थेट सवाल आता उपस्थित होत आहे.

मंगळवारी (24 नोव्हेंबर) मध्यरात्री चोरट्यांनी पाचोड बसस्थानकाजवळील जनरिक मेडिकल स्टोअरचे शटर तोडून तीन हजारांची रोकड आणि सीसीटीव्ही यंत्रणा (डीव्हीआर व हार्डडिस्क) लंपास केली. याच रात्री एकाची दुचाकी घरासमोरून पळवली, तर कोळी बोडखा व परिसरातील 15 शेतकऱ्यांच्या सोलर कृषिपंपांच्या वायर चोरून नेल्या. गेल्या सहा महिन्यांत 800 ते 900 शेतकऱ्यांचे असेच नुकसान झाल्याचा दावा होत असून, दुष्काळात सिंचन व्यवस्था कोलमडल्याने शेतशिवारात गस्त वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

याआधी शुक्रवारी (20 नोव्हेंबर) रात्री हॉटेल निसर्गसमोर दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. सपोनि सचिन पंडित यांनी शासकीय वाहन थांबवून जमावबंदी आदेशाची जाणीव करून दिली, गाडीचा दिवा आणि सायरनही वाजवला; तरीही दोन्ही गटांनी पोलिसांचे आदेश धुडकावून त्यांच्यासमोरच लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू ठेवली. अखेर अतिरिक्त कुमक बोलावून जमाव पांगवावा लागला. या प्रकरणी 13 जणांसह इतर 7 ते 8 जणांवर गुन्हा नोंदवला आहे.

त्याच्या एकच दिवस आधी, गुरुवारी (19 नोव्हेंबर) विहामांडव्यात विनाक्रमांकाच्या वाहनातून अवैध मुरूम वाहतूक रोखणाऱ्या दिव्यांग ग्राम महसूल अधिकाऱ्याला धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ही केवळ एक घटना नसून, अशा अनेक विनाक्रमांकाच्या गाड्या परिसरातून बिनधास्त मुरूम आणि वाळूची चोरी करत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक करत आहेत.

पैठण खासदार संदीपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांचा बालेकिल्ला मानला जातो. राज्याच्या राजकारणात मंत्रिपदाची चर्चा आणि महत्त्वाकांक्षा रंगली असताना, राज्याचा विचार करण्याआधी आमदार विलास भुमरे यांनी स्वतःच्या बालेकिल्ल्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाती घ्यावा, अशी मागणी आता जनतेतून जोर धरू लागली आहे.

ज्या मतदारांनी विश्वास टाकला, त्यांच्याच भागात दिवसाढवळ्या अवैध खनिज वाहतूक होते, विनाक्रमांकाच्या गाड्या धावतात, सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या शेतातल्या वायर चोरीला जातात आणि भररस्त्यात पोलिसांचे आदेश धुडकावले जातात. हे चित्र लोकप्रतिनिधींच्या कानी जात नाही की त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होतेय, असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत. आता तरी खासदार आणि आमदारांनी यात लक्ष घालून प्रशासनाला जाब विचारावा, अशी मागणी जोर धरत आहे.

छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी राजकीय दबावाला न जुमानता अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करत आहेत. वरिष्ठ पातळीवर एवढी कडक शिस्त असताना पाचोड ठाण्याच्या हद्दीतच जुना कारभार आणि स्थानिक लागेबांधे का चालतात, हा खरा मुद्दा आहे. पैठण तालुक्यातील अवैध धंदे आणि वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस प्रशासनाने आता थेट आणि कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही