प्रतिनिधी, 21 नोव्हेंबर: आयपीएल २०२६ च्या रिटेन्शन प्रक्रियेत राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वालचे भवितव्य हा सध्या सर्वात चर्चेचा विषय ठरला आहे. जैस्वालने संघ सोडण्याची इच्छा दर्शवल्याने, राजस्थान रॉयल्सने त्याला दुसऱ्या संघात ‘ट्रेड’ करण्याबाबत अनेक फ्रँचायझींसोबत चर्चा सुरू केल्याचे वृत्त आहे.
राजस्थान रॉयल्सने गेल्या दोन महिन्यांपासून काही संघांसोबत वाटाघाटी केल्या असून तब्बल ४ आयपीएल संघ त्याला घेण्यासाठी शर्यतीत उतरले आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही चर्चेतून अंतिम करार होऊ शकलेला नाही.
राजस्थान रॉयल्सने २०२० पासून जैस्वालला पाठिंबा दिला आहे. गेल्या दोन आयपीएल हंगामात युवा वैभव सूर्यवंशीसोबतची त्याची सलामीची भागीदारी संघासाठी अत्यंत फायदेशीर ठरली. मात्र, गेल्या हंगामात रियान परागकडे संघाचे नेतृत्व सोपवल्यानंतर परिस्थिती बदलली.
रियान परागच्या नेतृत्वात संघाने तिसरे स्थान मिळवले होते आणि नवीन व्यवस्थापन त्याच्याकडेच कर्णधारपद कायम ठेवण्यास उत्सुक आहे. दुसरीकडे, यशस्वी जैस्वाललाही कर्णधारपद हवे असल्याने त्याने संघ सोडण्याची तयारी दर्शवली आहे.
याबाबत एका आयपीएल सूत्राने सांगितले की, “रॉयल्सची त्याला संघात कायम ठेवण्याची पहिली पसंती असेल. परंतु तो फ्रँचायझीमध्ये आनंदी नसल्याचे दिसत असल्याने, त्यांनी त्याच्या जागी पर्यायी खेळाडूचा शोध सुरू केला आहे.”
लखनौ सुपर जायंट्सने (LSG) रिटेन्शनच्या मुदतीपर्यंत जैस्वालसाठी चर्चा केली होती. मात्र, राजस्थानने मोबदल्यात दोन खेळाडूंची मागणी केली, जी देण्यास लखनौ तयार नसल्याने हा करार फिस्कटला. तसेच, केएल राहुलच्या साथीला एक अनुभवी सलामीवीर हवा असल्याने दिल्ली कॅपिटल्सनेही (DC) राजस्थानशी संपर्क साधला होता. परंतु, दिल्लीने ऑफर केलेले खेळाडू राजस्थानला पसंत न पडल्याने तोही प्रस्ताव फेटाळला गेला.
या व्यतिरिक्त मुंबई इंडियन्सने (MI) देखील जैस्वालला संघात घेण्याचा विचार केल्याचे वृत्त आहे. तसेच, आयपीएल २०२७ पूर्वी नव्याने संघबांधणी करत असलेली कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ही फ्रँचायझीदेखील या शर्यतीत उतरू शकते.
जैस्वालने २०२० ते २०२६ दरम्यान राजस्थानसाठी दमदार कामगिरी करत ८३ सामन्यांत ३३.६८ ची सरासरी आणि १५२.८० च्या स्ट्राईक रेटने २५९३ धावा केल्या आहेत. यात दोन शतके आणि १८ अर्धशतकांचा समावेश आहे.
१६ डिसेंबर रोजी गोव्यात होणाऱ्या आयपीएल २०२७ च्या मिनी लिलावाच्या आधी, ९ डिसेंबर रोजी पहिली ट्रेडिंग विंडो बंद होईल. त्यामुळे लिलावापूर्वी करार पूर्ण करण्यासाठी संघांकडे मर्यादित वेळ आहे. त्यानंतर १७ डिसेंबरपासून दुसरी ट्रेडिंग विंडो उघडेल, जी हंगाम सुरू होण्याच्या ३० दिवस आधीपर्यंत सुरू राहील.
या दुसऱ्या टप्प्यात संघांना केवळ आधीच करारात असलेल्या खेळाडूंना ट्रेड करता येईल. मिनी लिलावात विकत घेतलेले खेळाडू ट्रेडसाठी उपलब्ध नसतील. एखाद्या संघाने चांगली ऑफर दिल्यास, गोव्यातील लिलावानंतरही जैस्वालच्या भवितव्याबाबतची अनिश्चितता कायम राहू शकते.
📌 महत्वाच्या बातम्या
- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल डॉ. रुचिका शर्मांचे वादग्रस्त दावे; ‘९० टक्के युद्धे मराठ्यांविरुद्ध’
- ‘इस्लाई फाउंडेशन’ ते ‘शहाजी पाटील’ फेक अकाउंट; पैगंबर शेख यांच्यावर बदनामीचे आरोप, सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोप
- ४००० कोटींपेक्षा जास्त कमाई करणार! ‘रामायण’ चित्रपटाबाबत अभिनेत्री लारा दत्ताचा मोठा दावा








