‘इस्लाई फाउंडेशन’ ते ‘शहाजी पाटील’ फेक अकाउंट; पैगंबर शेख यांच्यावर बदनामीचे आरोप, सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोप

‘शहाजी पाटील’ बनावट खात्यावरून बदनामी केल्याच्या आरोपावरून पैगंबर शेख आणि प्रशांत भोसले यांच्यात वाद निर्माण झाला आहे. विकास लवांडेंच्या मध्यस्थीनंतरही यावर तोडगा निघालेला नाही.

Published On: 

पुणे– ‘शहाजी पाटील’ या बनावट सोशल मीडिया खात्यावरून बदनामी केल्याचा आरोप पैगंबर शेख यांच्यावर करण्यात आला असून, या प्रकरणावरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. प्रशांत भोसले यांनी याविरोधात आवाज उठवल्यानंतर या प्रकरणातील ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) प्रवक्ते विकास लवांडे यांनी मध्यस्थीचा प्रयत्न करूनही या वादावर अद्याप पडदा पडलेला नाही.

या वादाची सुरुवात ‘इस्लाई फाउंडेशन’वरून झाल्याचा दावा प्रशांत भोसले यांनी केला आहे. धर्मादाय आयुक्तांच्या देखरेखीखालील एनजीओऐवजी ही एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असून, त्यात पैगंबर शेख आणि त्यांची पत्नी हे दोघेच संचालक आहेत. या कंपनीच्या नावाखाली आर्थिक कुर्बानीसाठी पैसे गोळा केले जात असल्याबद्दल काही जणांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यातील एका व्यक्तीला खजिनदार म्हणून घेण्याचे आश्वासन देऊन आधार आणि पॅन कार्ड मागवण्यात आले, मात्र त्याला घेतले नाही; त्यानंतर त्या व्यक्तीने ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल केल्याने शेख यांचे ट्रोलिंग सुरू झाले, असे भोसले यांनी सांगितले.

आपल्या ‘पार्टी ट्रस्ट’ ग्रुपमधील काहींनी ट्रोलिंग केल्याचा राग धरून शेख यांनी ‘शहाजी पाटील’ नावाने बनावट खाते काढल्याचा आरोप भोसले यांनी केला आहे. या खात्यावरून गेल्या तीन-चार महिन्यांपासून आपल्यासह अमर चव्हाण यांच्याविरोधात पोस्ट केल्या जात होत्या, ज्याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात अर्जही देण्यात आला होता. भाऊबीजेच्या दिवशी योगेश सावंत यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट आल्यानंतर सावंत यांनी आणि आपण स्वतः शेख यांना फोन करून हे थांबवण्याची विनंती केली, पण त्यांनी ते मान्य न केल्याने कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर टाकल्याचे भोसले म्हणाले.

 

या प्रकरणात विकास लवांडे यांनी मध्यस्थी करून कॉन्फरन्स कॉलवर चर्चा घडवून आणली होती. प्रशांत भोसले यांची व्यक्तिगत बदनामी झाल्याचे पैगंबर शेख यांनी एकत्रित चर्चेत मान्य केले होते आणि त्यानुसार व्हिडिओ बनवण्याचे ठरले होते, असे लवांडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. मात्र, रात्री एक वाजता शेख यांनी टाकलेल्या १७ मिनिटांच्या व्हिडिओमध्ये ‘शहाजी पाटील’ खाते आपलेच असल्याची कबुली दिली नाही, असा आक्षेप भोसले यांनी घेतला आहे. चर्चेत ठरलेल्या मुद्द्यांवर सुस्पष्ट न बोलल्याने विषय थांबला नसल्याचे लवांडे यांनीही नमूद केले.

दुसरीकडे, पैगंबर शेख यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आपली बाजू मांडली आहे. “माझी माणसं माझ्या विरोधात गेली म्हणून बाहेरच्यांनी त्याचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करू नये. माझ्या माणसांबाबत मी चुकलो असेल तर चारदा माफी मागेल. त्यांच्यासाठी अजूनही मी जीव द्यायला तयार आहे, पण मनुवाद्यांच्या आणि धर्मांधांच्या समोर मी झुकणार नाही. आता माझा जीव कशासाठी घ्यायचा हे माझ्या माणसांनीच ठरवावे,” असे त्यांनी म्हटले आहे. यावर प्रशांत भोसले यांनी तीव्र शब्दांत टीका करत ‘शहाजी पाटील’ हे खाते तुमचे होते की नाही, याचेच थेट उत्तर द्यावे, अशी मागणी कायम ठेवली आहे. या आरोपांबाबत पैगंबर शेख यांची बाजू समजून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

दरम्यान, या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याच्या चर्चांवर भोसले यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “आमचा लढा केवळ त्या व्यक्तीशी आहे, जाती-धर्माशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही. १५ वर्षांपासून आम्ही त्यांना ओळखतो. त्यांनी फक्त ते खाते आपले होते आणि त्यावरून बदनामी केली हे मान्य करावे, आम्ही विषय तिथेच संपवायला तयार आहोत,” असे भोसले यांनी सांगितले. तसेच, विकास लवांडे आणि अभिनेते किरण माने यांनी शुद्ध हेतूने भूमिका घेतली असून, किरण माने यांना आवश्यक पुरावे दिले आहेत; त्यामुळे दोघांनाही कोणी ट्रोल करू नये, असे आवाहनही भोसले यांनी केले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही