प्रतिनिधी, 18 नोव्हेंबर: ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या आगामी चित्रपटाच्या नावावरून आणि प्रदर्शनावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी एका मुलाखतीदरम्यान आपली भूमिका स्पष्ट करत राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार शब्दांत निशाणा साधला आहे.
रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असताना महिलांच्या प्रश्नांसाठी अशीच ताकद दाखवली असती, तर अनेक गोष्टी घडण्यापासून रोखता आल्या असत्या, असा संताप दीपाली सय्यद यांनी व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी चाकणकरांच्या सध्याच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप नोंदवला.
सध्या पदावर नसताना चाकणकर आरडाओरडा करत आहेत, ट्रेडमार्कचा मुद्दा उपस्थित करत आहेत आणि सेन्सॉर बोर्डासमोर अडचणी निर्माण करून चित्रपट बाजारात येऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत, असा आरोप सय्यद यांनी केला. “हीच ताकद तुम्ही अध्यक्षपदी असताना लावली असती, तर अनेक गोष्टी थांबल्या असत्या,” असे त्या म्हणाल्या. तसेच, खरातला शिक्षा व्हावी आणि दुसरा खरात निर्माण होऊ नये यासाठी आजही त्या सोबत उभ्या राहिल्या असत्या, तर लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले असते, असा टोलाही त्यांनी लगावला.
चित्रपटाच्या आशयाबद्दल बोलताना दीपाली सय्यद यांनी सांगितले की, सिनेमाचा मूळ विषय सत्य असला तरी तो मांडताना काही गोष्टी काल्पनिक पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. चित्रपटात काही प्रसंग दाखवताना सिनेमॅटिक लिबर्टी घेतली जाते, त्यामुळे प्रेक्षकांनीही ही गोष्ट समजून घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, वादाच्या भोवऱ्यात अडकलेला ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ हा चित्रपट येत्या २० नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये मनोज जोशी, सुबोध भावे आणि उदय टिकेकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- हवामान खात्याचा अलर्ट: उत्तरेकडील वाऱ्यांमुळे राज्यात गारठा, तर ‘अक्वान’ वादळामुळे विदर्भात पावसाची शक्यता
- पायाच्या स्नायूला दुखापत झाल्याने टेम्बा बावुमा बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मैदानाबाहेर
- हिवाळ्यात केस कोरडे आणि पांढरे होतायत? रसायनांविना केस काळे करण्यासाठी ‘हे’ नैसर्गिक उपाय ठरतील उपयुक्त








