प्रतिनिधी, 15 नोव्हेंबर: तीन दशकांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर इंग्लंडचा क्रिकेट संघ ऐतिहासिक कसोटी सामन्यासाठी झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. बाली येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) बैठकीतील चर्चेनंतर, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) झिम्बाब्वेविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळण्यास तत्त्वतः संमती दिली आहे. हा सामना २०२७ ते २०३१ च्या आगामी आयसीसी फ्युचर टुर्स प्रोग्राम (FTP) अंतर्गत खेळवला जाईल.
या ऐतिहासिक कसोटी सामन्याची निश्चित तारीख अद्याप ठरलेली नाही. मात्र, हा सामना व्हिक्टोरिया फॉल्स येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या ‘मोसी-ओए-तुन्या’ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होण्याची शक्यता आहे. हे नवे स्टेडियम पुढील वर्षी सुरू होणार असून, २०२७ च्या वनडे वर्ल्डकपमधील चार सामन्यांचे आयोजनही येथे केले जाणार आहे. या वर्ल्डकपचे यजमानपद झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका आणि नामिबिया यांच्याकडे संयुक्तपणे आहे.
राजकीय तणावामुळे इंग्लंड आणि झिम्बाब्वे यांच्यात प्रदीर्घ काळ क्रिकेट मालिका झालेल्या नाहीत. २००८ मध्ये ईसीबीने झिम्बाब्वेसोबतचे क्रिकेट संबंध स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता आणि २००९ मधील त्यांचा नियोजित इंग्लंड दौराही रद्द केला होता. त्यापूर्वी २००३ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव इंग्लंडने हरारे येथील साखळी सामना खेळण्यास नकार दिला होता. परिणामी आयसीसीने झिम्बाब्वेला गुण दिले, ज्यामुळे ते सुपर सिक्समध्ये पोहोचले आणि इंग्लंड स्पर्धेबाहेर फेकले गेले.
२००४ मध्ये मायकेल वॉनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने झिम्बाब्वेत वनडे मालिका खेळली होती. मात्र, त्यानंतर कोणत्याही फॉरमॅटमध्ये हे दोन्ही संघ २१ वर्षे आमनेसामने आले नाहीत. २०२५ मध्ये झिम्बाब्वेने ट्रेंट ब्रिजवर एक कसोटी सामना खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केल्यानंतर ही दरी अखेर मिटली.
इंग्लंडने यापूर्वी १९९६ मध्ये झिम्बाब्वेमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. हा दौरा त्याच्या नाट्यमय शेवटासाठी आजही लक्षात ठेवला जातो. बुलावायो येथील पहिल्या सामन्यात दोन्ही संघांच्या धावा समान झाल्या होत्या. २०५ धावांचे लक्ष्य गाठताना इंग्लंडला शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज होती, मात्र तिसरी धाव पूर्ण करण्याच्या प्रयत्नात निक नाइट धावबाद झाला आणि सामना अनिर्णित राहिला.
या सामन्यानंतर इंग्लंडचे तत्कालीन प्रशिक्षक डेव्हिड लॉयड प्रचंड संतापले होते. संतप्त लॉयड म्हणाले होते, “आम्ही त्यांना अक्षरशः संपवलं. त्यांना धूळ चारली. त्यांना पूर्णपणे चिरडून टाकलं. हे त्यांनाही माहीत आहे आणि आम्हालाही माहीत आहे.” लॉयड यांच्या या वक्तव्याची दौऱ्यात खूप चर्चा झाली आणि नंतर ईसीबीने त्यांना समज दिली. त्यानंतर दुसरा कसोटी सामना आणि मालिकाही अनिर्णित राहिली होती.
दरम्यान, बाली येथील बैठकीत ईसीबी २०२७-२०३१ या कालावधीतील उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक अंतिम करणार असून, मुख्य भर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) सामन्यांवर असणार आहे. स्पर्धेत सर्व पूर्ण सदस्यांना सामावून घेण्याचे प्रयत्न होऊनही, झिम्बाब्वे, आयर्लंड आणि अफगाणिस्तानला आगामी WTC सायकलमध्ये स्थान मिळण्याची शक्यता नाही. प्रदीर्घ चर्चेनंतर, किमान २०२९ पर्यंत WTC मध्ये केवळ ९ संघच कायम ठेवण्यावर आयसीसी बोर्ड शिक्कामोर्तब करेल अशी अपेक्षा आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- सूर्यकुमार यादवचं दणदणीत कमबॅक! १५ चेंडूत अर्धशतक झळकावत श्रेयस अय्यरला दिला धोक्याचा इशारा
- वैभव सूर्यवंशी बनला टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात तरुण कर्णधार; मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये रचला विक्रम
- खासदार बजरंग सोनवणेंच्या भाषणापूर्वी तरुणाने घेतला माईक; गेवराईत पाण्यासाठी विचारला जाब








यूट्यूब वॉचअलॉन्ग शोवरून ईसीबीचा दिग्गज समालोचकांना ॲशेस मालिकेत बंदीचा इशारा