प्रतिनिधी, 10 नोव्हेंबर: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका अनौपचारिक चर्चेत गोकुळवर शासनाचे चार संचालक नियुक्त करण्याच्या निर्णयाबाबत महत्त्वाची माहिती दिली. “मी कोणा एका व्यक्तीच्या नाही, तर कायदा आणि संस्थेच्या पाठीशी आहे. सतेज पाटील आणि मुश्रीफ यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला असता, तर शासनाचे संचालक पाठवलेच नसते,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
या नियुक्तीमागील कारण स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले की, गोकुळमध्ये एका गटाचे १३ तर दुसऱ्या गटाचे १२ सदस्य झाल्याने वैधानिक पेच निर्माण झाला होता. कोरम पूर्ण होत नव्हता आणि कोणत्याही एका गटाला सत्ता स्थापन करणे शक्य नव्हते. एका व्यक्तीच्या भरवशावर अध्यक्ष निवडता येत नव्हता. शासनाला घाई असती तर निवडणुकीनंतर लगेचच संचालक नियुक्त केले असते; यात डीडीआर देखील असतो. मात्र, दोन्ही बाजूंकडे कोरम नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या निर्णयाला राजकीय रंग दिला गेल्याची खंत फडणवीस यांनी व्यक्त केली. या प्रकरणात थेट राहुल गांधींना उतरावे लागले. सहकार क्षेत्रातील अनुभव असलेल्यांचीच गोकुळवर नियुक्ती केली असून, त्यात एक गायनॅकोलॉजिस्ट असेल तर त्यात चूक काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “देशाच्या विरोधी पक्षनेत्याला जर यात लक्ष घालावे लागत असेल, तर गायनॅकोलॉजिस्ट हा साधा माणूस आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला.
सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत फडणवीस यांनी माहिती दिली की, उच्च न्यायालयाने कालच्या सुनावणीत शासनाच्या अध्यादेशात कोणतीही त्रुटी (डिफेक्ट) नसल्याचे म्हटले आहे. तसेच या चार नियुक्त संचालकांची मते वेगळी ठेवून निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीकडून राजेश पाटील आणि समविचारी आघाडीकडून शशिकांत पाटील-चुयेकर हे उमेदवार रिंगणात आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- आयपीएल इतिहासातील टॉप १० सर्वात मोठे ट्रेड आणि ट्रान्सफर; हार्दिक-अर्शदीप स्वॅप तिसऱ्या क्रमांकावर
- राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेत रोहित पवारांचे सूचक ट्विट; वेगळी भूमिका घेणार?
- गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीकडून राजेश पाटील रिंगणात; ‘फेटा न बांधण्याच्या’ निर्धाराची पुन्हा चर्चा
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








