प्रतिनिधी, 9 नोव्हेंबर: बांगलादेशचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज मुशफिकुर रहीमने कसोटी क्रिकेटमध्ये ७ हजार धावांचा टप्पा पूर्ण करत नवा इतिहास रचला आहे. कसोटीत असा विक्रम करणारा तो पहिलाच आणि एकमेव बांगलादेशी क्रिकेटपटू ठरला आहे. सोमवारी (९ नोव्हेंबर) सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात त्याने ही मोठी कामगिरी केली.
उपाहारानंतर रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर एक धाव घेत मुशफिकुरने ७ हजार धावांचा पल्ला गाठला. विशेष म्हणजे, मुशफिकुरला सुरुवातीला आपण हा ऐतिहासिक विक्रम गाठला आहे याची जाणीवच नव्हती. जेव्हा ड्रेसिंग रूममधील त्याच्या सहकाऱ्यांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या, तेव्हा त्याला या विक्रमाची माहिती मिळाली. या कामगिरीतून त्याने बांगलादेश क्रिकेटमधील आपले महत्त्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
२००५ मध्ये यष्टीरक्षक आणि तळाच्या फळीतील फलंदाज म्हणून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या ३८ वर्षीय मुशफिकुरचा हा १०७ वा कसोटी सामना आहे. बांगलादेशकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. याआधी २०२२ मध्ये ५ हजार आणि २०२४ मध्ये ६ हजार कसोटी धावांचा टप्पा ओलांडणाराही तो पहिला बांगलादेशी फलंदाज होता. आतापर्यंत त्याने १९७ डावांमध्ये १४ शतके आणि ३० अर्धशतके झळकावली आहेत.
बांगलादेशच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मुशफिकुर मोठ्या फरकाने आघाडीवर आहे. त्याच्यानंतर मोमिनुल हक (१५२ डावांत ५२९३ धावा, १३ शतके) दुसऱ्या, तर तमीम इक्बाल (७० सामन्यांतील १३४ डावांत ५१३४ धावा, १० शतके) तिसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय शकीब अल हसन (४६०९ धावा), लिटन दास (३५५७ धावा), हबिबुल बशर (३०२६ धावा), महमुदुल्लाह (२९१४ धावा), नजमुल हुसेन शांतो (२८६६ धावा), मोहम्मद अश्रफुल (२७३७ धावा) आणि मेहदी हसन मिराज (२४२४ धावा) यांचा या यादीत क्रमांक लागतो.
कसोटी क्रिकेटव्यतिरिक्त मुशफिकुरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६६९७ तर टी-२० मध्ये १४९५ धावा केल्या आहेत. या दोन्ही मर्यादित षटकांच्या प्रकारातून त्याने यापूर्वीच निवृत्ती घेतली असली, तरी तो कसोटीत खेळत आहे. २०१८ मध्ये त्याने झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद २१९ धावांची संस्मरणीय खेळी केली होती. अनेक वर्षे ही बांगलादेशी फलंदाजाची कसोटीतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती, मात्र सध्या सुरू असलेल्या सिल्हेट कसोटीच्या पहिल्या डावात तौहीद हृदोयने नाबाद २४२ धावांची खेळी करत त्याचा हा विक्रम मोडला.
बोटाच्या दुखापतीमुळे मुशफिकुर वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळू शकला नव्हता. मात्र दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करत त्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले. सिल्हेट कसोटीच्या शेवटच्या दिवशी वेस्ट इंडिजने ३९८/६ वर डाव घोषित करत बांगलादेशसमोर ३६९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना तौहीद हृदोय आणि मुशफिकुर यांनी नाबाद ११३ धावांची शानदार भागीदारी करत संघाच्या आशा पल्लवित ठेवल्या आहेत.
या दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावणारा तौहीद हृदोय हा एकाच कसोटी सामन्यात द्विशतक आणि अर्धशतक करणारा पहिला बांगलादेशी फलंदाज ठरला आहे. तसेच, एका कसोटी सामन्यात बांगलादेशकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावावर केला आहे. घरच्या मैदानावर सुरू असलेली ही दोन सामन्यांची मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी बांगलादेशला आता अखेरच्या ३० षटकांत २०७ धावांची गरज आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- सुनील तटकरे कुणाचेही होऊ शकत नाहीत; रामदास कदमांचा गंभीर आरोप, औकातीत राहण्याचा दिला इशारा
- ‘मुख्यमंत्री माझं ऐकतात, ही भाजप नेत्यांची दंतकथाच’; राज ठाकरेंची फटकेबाजी
- गोकुळच्या षडयंत्रामागे पुण्याच्या दादांचा हात; विवेकानंद पाटलांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







