प्रतिनिधी, 18 ऑक्टोबर: संजय राऊत यांनी केंद्रातील भाजप सरकार लवकरच कोसळणार असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जागी देशात नवीन पंतप्रधान आणि नवे नेतृत्व पाहायला मिळेल, असे राऊत यांनी म्हटले आहे.
सध्या दिल्लीसह देशाच्या विविध भागांमध्ये आंदोलने सुरू आहेत. इंडिया आघाडीकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आक्रमक निदर्शने करण्यात आली असून, लवकरच दिल्लीतील रामलीला मैदानावरही इंडिया आघाडीचे मोठे आंदोलन होणार आहे. विरोधी पक्षांतील नेत्यांकडून गेल्या काही काळापासून पुढील सहा महिन्यांत मोदी सरकार पडेल, असा दावा केला जात होता. आता राऊतांनीही या दाव्याचा पुनरुच्चार केला आहे. नव्या सरकारविषयी बोलताना राऊत म्हणाले की, 'मोदींच्या जागी कोण येणार हे मी सांगू शकतो, पण आत्ताच नाव उघड करणार नाही. रेझिम चेंज म्हणजे रेझिम चेंज.'
राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीवरून त्यांनी फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "आम्ही १९७२ चा दुष्काळ पाहिला आहे, त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. मात्र, सध्याची परिस्थिती त्याहूनही गंभीर आहे. कोकणात यापूर्वी कधीही दुष्काळ जाहीर झाला नव्हता," असे राऊत म्हणाले. दुष्काळाचा सामना करण्यासाठी ५० हजार कोटी रुपयांची गरज असताना सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडावर केवळ ५ हजार रुपये फेकल्याचा आरोप त्यांनी केला.
निवडणुकीतील वारेमाप खर्चाकडे लक्ष वेधताना राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. राज्यकर्त्यांकडे निवडणुका लढवण्यासाठी प्रचंड अतिरिक्त पैसा आहे. मग तो भाजप असो, शिंदे गट असो वा सुनेत्रा पवार गट असो. बारामतीमधील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विजयी झालेल्या पॅनेलने तब्बल ३० कोटी रुपये खर्च केले. जर एका कारखान्याच्या निवडणुकीत २५-३० कोटी खर्च होत असतील आणि शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अर्धा तोळ्याचे दागिने, पैठणी, सफारी सूट तसेच पैशांचे वाटप होत असेल, तर हे राज्य गरीब आहे असे कसे म्हणता येईल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सरकारी तिजोरीत पैसा नसला तरी, तिजोरीच्या लुटीतून मिळवलेली अफाट संपत्ती सत्ताधाऱ्यांकडे आहे. सर्वाधिक पैसा भाजप आणि शिंदे गटाकडे असून, हा पैसा कुठून व कसा आला याचा खुलासा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केल्यास, राज्यावरील अर्धे कर्ज कमी होईल, असा टोला राऊत यांनी लगावला. तुमच्या मंत्र्यांचे नुसते खिसे झटकले तरी दुष्काळासाठी लागणारे १ लाख कोटी रुपये सहज जमा होतील, असा दावा त्यांनी केला.
तसेच, 'पन्नास खोके एकदम ओके' अशी गर्जना देणारे आणि नंतर भाजपमध्ये गेलेले एक माजी आमदार डान्सबारप्रमाणे नाचत होते व त्यांच्यावर पाच-पंचवीस लाख उडवले जात असल्याचे दिसत होते, याकडेही राऊतांनी लक्ष वेधले. अशा परिस्थितीत राज्यावर कर्ज आहे हे कसे मानायचे? सत्ताधारी पक्षाचे खासदार आणि आमदारांनी ठेकेदारांच्या माध्यमातून राज्याला लुटले असल्याचा घणाघात संजय राऊत यांनी केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- गोकुळ दूध महासंघाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात; उद्या कोण उधळणार गुलाल?
- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुख्यमंत्री फडणवीसांच्या खर्चात कपातीच्या सूचना
- गोकुळ दूध संघासाठी आज ३५ केंद्रांवर मतदान; ५० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






