प्रतिनिधी, 25 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने नुकत्याच घेतलेल्या प्रदीर्घ पत्रकार परिषदेतील विधानांवर माजी सलामीवीर उस्मान ख्वाजा याने मौन सोडले आहे. ‘द ग्रेड क्रिकेटर’ या पॉडकास्ट सत्रात बोलताना ख्वाजाने कमिन्सची टीका अत्यंत वैयक्तिक आणि दुखावणारी असल्याचे म्हटले आहे.
ख्वाजाने त्याच्या ‘सब्र’ (Sabr) या आत्मचरित्रात मोठा दावा केला होता. २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान सँडपेपरने चेंडूशी छेडछाड केली जाणार आहे, याची माहिती केवळ कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट, स्टीव्ह स्मिथ किंवा डेव्हिड वॉर्नर यांनाच नव्हे, तर संघातील प्रत्येक सदस्याला होती, असे त्याने पुस्तकात नमूद केले आहे.
ख्वाजाच्या या दाव्यानंतर, २०१८ च्या मालिकेचा भाग असलेल्या आणि संघाचा विद्यमान कर्णधार पॅट कमिन्सने ६८ मिनिटांची पत्रकार परिषद घेतली. त्याने ख्वाजाचे दावे पूर्णपणे चुकीचे असल्याचे सांगत ते फेटाळून लावले. या प्रदीर्घ पत्रकार परिषदेत बहुतांश वेळ कमिन्सने ख्वाजावरच पलटवार केला.
कमिन्सच्या या प्रतिक्रियेवर बोलताना ख्वाजा म्हणाला, “एक व्यक्ती आणि नेता म्हणून मला पॅट कमिन्स नेहमीच आवडतो. पण तो अशा प्रकारे समोर येऊन माझ्यावर वैयक्तिक हल्ला करेल, याची मला अजिबात अपेक्षा नव्हती. मी जे बोललो त्यावर टीका करणे ठीक होते, मात्र त्याने ज्या पद्धतीने सलग खूप वेळ माझ्यावर निशाणा साधला, ते निराशाजनक होते. मी त्याची अशी बाजू यापूर्वी कधीही पाहिली नव्हती.”
ही पत्रकार परिषद पाहणे आपल्यासाठी खूप कठीण होते, असेही ख्वाजाने स्पष्ट केले. तो म्हणाला, “मला ते पाहायचे नव्हते, पण तो माझ्याबद्दल काय बोलतोय हे जाणून घेण्यासाठी मला ते पुन्हा पुन्हा पाहावे लागले. त्यावेळी माझ्या शेजारी माझी पत्नी रॅचेल होती, ती मला सतत ‘तू ठीक आहेस ना?’ असे विचारत होती. पण त्यावेळी माझ्या मनात इतक्या भावना दाटून आल्या होत्या की मी तिला काहीच उत्तर देऊ शकलो नाही.”
या कडक टीकेनंतरही कमिन्सविषयी आपल्या मनात प्रेम कायम असल्याचे सांगत, दुरावा निर्माण करण्याऐवजी तडजोड करण्यासाठी पत्रकार परिषदेच्या काही दिवस आधी आपण त्याला मेसेज केल्याचा दावा ख्वाजाने केला.
“एखाद्या पत्रकार परिषदेतील ७० किंवा २० मिनिटांवरून मी त्याला पारखणार नाही. मी द्वेष करणारा माणूस नाही. पण हे सर्व आश्चर्यकारक होते, कारण मी काही दिवस आधीच त्याला मेसेज करून या प्रकरणात सर्वांना एकत्र आणणारा सुवर्णमध्य काढण्याची विनंती केली होती, जेणेकरून आपल्यात मोठी दरी निर्माण होणार नाही,” असे ख्वाजाने शेवटी स्पष्ट केले.








