Share

Rain Update : महाराष्ट्रात पावसाचा कहर सुरूच; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

मुंबई, पुणे आणि राज्यातील अनेक जिल्ह्यांत पुढील 48 तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून, पालघर, रायगड आणि घाट भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Published On: 

Rain Update

Rain Update : मुंबई आणि पुण्यासह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुढील ४८ तास मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. पालघर, रायगड आणि नाशिक व पुणे येथील घाट क्षेत्रांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे, तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूरसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ लागू करण्यात आला आहे.

पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचा वेग वाढल्याने संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. दक्षिण मुंबई, अंधेरी, बोरीवली, विरार, ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई, पनवेल, भिवंडी आणि पालघर या भागांत रात्रभर पाऊस पडत आहे. पुढील ४८ तासांनंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.

वसई-विरारमध्ये संततधार पाऊस

वसई-विरारमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही संततधार पाऊस सुरू आहे. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांतील रस्त्यांवर पाणी साचले आहे. नालासोपारा पूर्व येथील गाला नगर भागात रस्त्यांवर पाणी साचल्याने रिक्षा आणि इतर वाहनांना पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. दरम्यान, मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता, पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी आज जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे सकाळी शाळेच्या वेळेस होणारी नेहमीची लगबग दिसून आली नाही. मात्र, नोकरीनिमित्त बाहेर पडणाऱ्यांना पावसाचा सामना करत आणि पाण्यातून प्रवास करत कामाच्या ठिकाणी जावे लागत आहे. हवामान विभागाने दिवसभर मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. नागरिकांनी अत्यंत आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या भागात जनजीवन विस्कळीत

पालघर जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असून, डहाणू, तलासरी आणि कासा भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरपरिस्थितीमुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. डहाणू शहराला कानक्राडी नदीच्या पुराच्या पाण्याने वेढा घातला असून, बस डेपो, इराणी रोड आणि सागर लॉज परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तसेच दुकानांमध्येही पाणी शिरले आहे. दरम्यान, कासा परिसरातील घरांमध्ये पाणी शिरल्याचे वृत्त आहे आणि पूरस्थितीमुळे डहाणू-चारोटी व वाणगाव-चिंचणी यांना जोडणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, सारणी-उर्से-आईना-वाणगाव मार्गावर उर्से येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने हा मार्ग बंद झाला आहे, ज्यामुळे सुमारे १५ ते २० गावांचा संपर्क तुटला आहे.

रायगड जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा

रायगड जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून दाट ढग दाटून आले आहेत, ज्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. सलग दोन दिवसांच्या पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे; सावित्री, अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा यांसारख्या नद्या सध्या पूर्ण क्षमतेने वाहत आहेत. हवामान विभागाने आज देखील रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, जिल्ह्यातील २८ पैकी २२ धरणे १०० टक्के भरली असून, यामुळे जिल्ह्याचा पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागला आहे. पावसाचा जोर वाढत असल्याने, अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असा सल्ला जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दिला आहे.

पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. या मान्सून हंगामात पंचगंगा नदी पात्राबाहेर पडण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या २४ तासांत नदीच्या पाणी पातळीत आठ फुटांनी वाढ झाली असून, ती सध्या ३१ फूट ४ इंच इतकी झाली आहे. तसेच जिल्ह्यातील २३ बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्याच्या पूर्व भागात हलका पाऊस पडत असतानाच, पश्चिम घाट परिसरात मात्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ८५ ते ९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, त्यामुळे धरणांमधील पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. राधानगरी धरण सध्या ८६ टक्के भरले असून, त्यातून १,४०० क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे; त्यामुळे भोगावती आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नद्या पूर्ण क्षमतेने वाहत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही