प्रतिनिधी, 25 नोव्हेंबर: चेन्नई सुपर किंग्सचे (CSK) मुख्य प्रशिक्षक आणि ‘अँकर स्पोर्ट्स एबी’ (Anchor Sports AB) या क्रीडा कंपनीचे मालक जहीर खान यांनी एका नव्या क्रिकेट लीगची घोषणा केली आहे. त्यांनी जर्मन क्रिकेट फेडरेशनच्या सहकार्याने ‘इक्वल’ (Equal) नावाची एक ‘मिक्स्ड-जेंडर’ टी-२० क्रिकेट लीग सुरू करण्यासाठी पाऊल उचलले आहे. या लीगमध्ये पुरुष आणि महिला खेळाडू एकाच संघातून खेळताना दिसणार आहेत. युरोपियन देशांमध्ये, जिथे फुटबॉल अधिक लोकप्रिय आहे, तिथे चाहत्यांना एकत्र आणण्यासाठी आणि क्रिकेटचा विस्तार करण्यासाठी या लीगची मदत होईल, असा विश्वास जहीर खान यांनी व्यक्त केला आहे.
क्रिकेटच्या खेळात गेल्या काही वर्षांत मोठे बदल झाले असून, कसोटी क्रिकेटकडून चाहत्यांचा कल टी-२० क्रिकेटकडे वळला आहे. तसेच महिला क्रिकेटनेही मोठे लक्ष वेधून घेतले आहे. जगभरातील विविध फ्रँचायझी लीग, काही देशांमधील क्रिकेटपटूंना मिळणारे समान वेतन आणि २०२५ मध्ये भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने जिंकलेला एकदिवसीय विश्वचषक यामुळे या खेळात महिलांचा दबदबा वाढला आहे. आता या नव्या ‘मिक्स्ड-जेंडर’ टी-२० फॉरमॅटमुळे क्रिकेटमध्ये एक वेगळाच प्रयोग पाहायला मिळणार आहे.
जहीर खान यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “क्रिकेटमध्ये लोकांना एकत्र आणण्याची ताकद आहे आणि विशेषतः युरोपसारख्या उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये या खेळाचा विकास हा आपण तो किती व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो, यावर अवलंबून असेल.” ते पुढे म्हणाले की, “‘इक्वल’ सारखे उपक्रम या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहेत, ज्यामुळे सर्व लिंगाच्या लोकांना खेळात सहभागी होण्याची, योगदान देण्याची आणि खेळाच्या वाढीचा भाग होण्याची संधी मिळेल.”
उद्योजक नागेंद्र सिद्दौतम यांनी या उपक्रमाविषयी बोलताना सांगितले की, पारंपारिकरित्या पुरुष आणि महिला क्रिकेटची होत आलेली विभागणी या लीगमुळे संपुष्टात येईल. “अनेक पिढ्यांपासून पुरुष आणि महिला क्रिकेट वेगवेगळ्या स्वरूपात विकसित झाले आहे. जेव्हा पुरुष आणि महिला एकाच संघात (XI) एकत्र येतात तेव्हा काय होते, असा प्रश्न ‘इक्वल’ विचारण्याचे धाडस करत आहे,” असे ते म्हणाले. याशिवाय, त्यांनी स्वीडनमधील एका इनडोअर लीगचे उदाहरण दिले, जिथे पहिल्यांदाच सहा शाळा एकत्र खेळल्या होत्या. मुख्य प्रवाहात क्रिकेट नसलेल्या देशांमध्ये अशाच प्रकारचा विकास आणि इकोसिस्टम उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली, ज्यामुळे मुले आणि त्यांचे कुटुंबीय खेळाकडे आकर्षित होतील.
डीसीबीचे (DCB) अध्यक्ष सेव्हेरिन वेस (Severin Weiß) यांच्या मते, जर्मनीमध्ये आधीपासूनच क्रिकेट खेळणाऱ्या पुरुष आणि महिलांचा एक मोठा गट आहे. ही नवी लीग या समुदायांना ‘मिक्स्ड-जेंडर’ क्रिकेटसाठी अधिक संघटित आणि स्पर्धात्मक वातावरणात एकत्र आणू शकते.
२०२८ च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होत आहे, त्या पार्श्वभूमीवर ही मिक्स्ड-जेंडर लीग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या लीगच्या माध्यमातून नव्या गुणवंतांचा विकास होईल, चाहत्यांचा सहभाग वाढेल आणि युरोपमध्ये क्रिकेटची व्याप्ती विस्तारेल. जहीर खान यांच्या मते, हा उपक्रम नव्या समुदायांपर्यंत क्रिकेटला पोहोचवण्याची आणि त्याचे जागतिक आकर्षण वाढवण्याची एक मोठी संधी प्रदान करेल.








