प्रतिनिधी, 21 नोव्हेंबर: मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (एमसीजी) शनिवारी झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात पदार्पणवीर लॅचलन शॉने सीमारेषेवर हवेत झेपावत एक अफलातून झेल टिपला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करताना शॉने डावाच्या १० व्या षटकात बेन ड्वार्शुईसच्या गोलंदाजीवर टॉम बॅंटनला बाद केले.
१० व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर ड्वार्शुईसने ताशी १३२.५ किमी वेगाने ऑफ स्टंपच्या बाहेर शॉर्ट-ऑफ-अ-लेंग्थ चेंडू टाकला. टॉम बॅंटनने मागे सरकत पूल शॉट मारण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू बॅटच्या आतल्या बाजूला लागून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला. २३ वर्षीय लॅचलन शॉने आपल्या उजव्या बाजूला वेगाने धावत जाऊन डाईव्ह मारली आणि दोन्ही हातांनी उत्कृष्ट झेल पूर्ण केला. यावेळी त्याचे कोपर जमिनीवर आदळले तरीही त्याने चेंडू निसटू दिला नाही. या विकेटमुळे ऑस्ट्रेलियाला इंग्लंडच्या दोन सेट फलंदाजांना लवकर बाद करण्यात यश आले. क्रिकेट डॉट कॉम डॉट एयू (cricket.com.au) ने याचा व्हिडीओ शेअर करत ‘लॅची शॉ, अशक्यच! पदार्पणवीराकडून किती अप्रतिम कामगिरी,’ अशा शब्दांत कौतुक केले आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिच मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडची सुरुवात खराब झाली. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर जोएल डेव्हिसने मिड-ऑफला झेल टिपत फिल सॉल्टला बाद केले. त्यानंतर तिसऱ्या षटकात जॅक एडवर्ड्सने अन्यूरिन डोनाल्डला १० धावांवर बाद करत पाहुण्या संघाला सुरुवातीलाच दबावाखाली आणले.
मात्र, इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने मिळालेल्या दोन जीवदानांचा पुरेपूर फायदा उचलला. जॅक फ्रेझर-मॅगर्क आणि अॅडम झाम्पा यांनी अनुक्रमे दोन व तीन धावांवर असताना त्याचे झेल सोडले. त्यानंतर ब्रूकने आपल्या टी-२० कारकिर्दीतील दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक केवळ २० चेंडूत पूर्ण केले. त्याने २८ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. निखिल चौधरीने त्याला बाद केले. त्यापूर्वी ब्रूक आणि बॅंटन यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी झाली. बॅंटनने २२ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३९ धावा केल्या, परंतु शॉच्या शानदार झेलमुळे त्याची खेळी संपुष्टात आली.
विल जॅक्सही लवकरच तंबूत परतला. मात्र सॅम करन आणि जॉर्डन कॉक्स, तसेच लियाम डॉसन आणि कॉक्स यांच्यातील भागीदारीमुळे इंग्लंडला १९० धावांच्या जवळपास पोहोचता आले. पहिल्या १० षटकांत ११७ धावा करणाऱ्या इंग्लंडने २० षटकांत १८७/९ अशी मजल मारली. ऑस्ट्रेलियाकडून जॅक एडवर्ड्स आणि निखिल चौधरी यांनी प्रत्येकी दोन, तर इतर चार गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात लॅचलन शॉ आणि व्हिक्टोरियाचा यष्टिरक्षक सॅम हार्पर यांनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आगामी कसोटी हंगामाच्या तयारीसाठी जोश इंग्लिस आणि सलामीवीर ट्रॅव्हिस हेड यांना विश्रांती देण्यात आल्याने हार्परला ही संधी मिळाली. साऊथ ऑस्ट्रेलियासाठी वन-डे कपमध्ये चांगली सुरुवात केल्याने जॅक फ्रेझर-मॅगर्कनेही गेल्या वर्षीच्या जुलै नंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.
ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीतही बदल करण्यात आले असून, क्वाड्रिसेप्स स्ट्रेन आणि गुडघ्याच्या दुखापतीमुळे अनुक्रमे माहली बर्डमन व झेवियर बार्टलेट या मालिकेतून बाहेर पडले आहेत. त्यांच्या जागी कव्हर म्हणून बिली स्टॅनलेकचा संघात समावेश करण्यात आला. तसेच, पाठीच्या स्नायूंच्या ताणामुळे तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला मुकलेला फिरकीपटू अॅडम झाम्पा पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला.
📌 महत्वाच्या बातम्या
- IND vs PAK: अंतिम सामना न खेळताही पाकिस्तानने ब्लाइंड आशिया कप २०२६ कसा जिंकला?
- आयपीएल २०२७: चेन्नई आणि गुजरात टायटन्समधील ट्रेडच्या चर्चांवर झहीर खानने दिली प्रतिक्रिया
- पॅट कमिन्सला कर्णधारपदावरून हटवल्यास बंड पुकारू; जोश हेझलवूडचा इशारा








