राज्याचे माजी मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार म्हणून नारायण राणे (Narayan Rane) यांचे नाव सर्वप्रथम आपणच सुचवले होते आणि त्यानंतर लगेचच आपल्याला थेट मंत्रिपदाच्या पातळीवरून धमक्या मिळाल्या होत्या, असे त्यांनी सांगितले. एका स्थानिक कार्यक्रमात बोलताना केसरकर यांनी हा खुलासा केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
दीपक केसरकर यांनी सांगितले की, “नारायण राणे यांना तिकीट मिळावे म्हणून मी सर्वात आधी आवाज उठवला होता. राणे साहेबांनी खासदारकीला उभे राहावे असे सर्वात आधी मी म्हटले. तोपर्यंत राणे साहेबांचे निवडणुकीला उभे राहण्याचे ठरलेही नव्हते. परंतु, जे लोक इच्छुक होते, त्यांनी मला धमक्या दिल्या.”
Deepak Kesarkar on Narayan Rane
“राणे यांचे नाव सूचवल्याने त्यांचा पोटशूळ उठला. त्यांनी धमक्या द्यायला सुरुवात केली. त्या धमक्यांचे व्हॉटसअप चॅट माझ्याकडे होते. ते डीलिट झाले, नाही तर दाखवले असते. तुम्ही राणेंचे नाव सूचवले, तुम्ही मंत्री असणार नाही, अशा धमक्या मला दिल्या गेल्या.” असा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला आहे.
पुढे केसरकर यांनी नमूद केले की, एक गोष्ट सांगतो, मनात असेल तर करायचे असते. मी मंत्री असलो नसलो तरी साईबाबांची कृपा माझ्यावर आहे. माझे चांगले चालू राहील. देवाच्या कृपेने आजोबा वडिलांचा वारसा आहे. माझे व्यवसायाकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळेच मंत्री नसणे कदाचित साईबाबांच्या मनात असेल.”
पुढे ते म्हणाले की, मी कुटुंबाकडे जे दुर्लक्ष केले, त्याकडे लक्ष द्यावे असे साईबाबांना वाटत असेल. माझे कुटुंब म्हणजे स्वत:चे कुटुंब नाही, सावंतवाडीची जनता ही माझे कुटुंब आहे. एवढा कार्यक्रम असातनाही मी पहिले प्राधान्य मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला दिली आहे,” असे केसरकर म्हणाले.
दरम्यान, शिंदे गटाने ठाकरे गटापासून फारकत घेतली आणि ‘महायुती’मध्ये सामील झाला. सुरुवातीच्या अडीच वर्षांच्या काळात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले आणि त्या सरकारमध्ये दीपक केसरकर यांनी मंत्री म्हणून काम पाहिले. या काळात राणे आणि केसरकर यांच्यातील राजकीय संघर्ष संपुष्टात आला आणि त्यांच्यात सलोखा निर्माण झाला.
त्यानंतर केसरकर यांनी सातत्याने राणे यांची प्रशंसा केली. त्यांनी राणे यांची कार्यपद्धती, त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ आणि त्यांच्या राजकीय व्यक्तिमत्त्वाचा मोठा आवाका यांबद्दल अनेकदा गौरवोद्गार काढले. केसरकर यांनी कोणत्याही वादात न पडण्याची खबरदारी घेतली आणि राणे यांनीही या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला.
इतकेच नव्हे, तर केसरकर यांनी राणे यांच्या दोन्ही मुलांशी असलेले राजकीय मतभेदही मिटवले. या पार्श्वभूमीवर, केसरकर यांनी राणे यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला. या आग्रहाचा मान राखून राणे यांनी निवडणूक लढवली आणि त्यात विजय मिळवला.
📌 महत्वाच्या बातम्या
- सुरेश ओबेरॉयंचा मोठा खुलासा; “राजकारणात फक्त पैसे कमवण्यात रस, मन रमत नव्हतं”
- ‘वंदे मातरम्’वरून काँग्रेस-भाजप आमनेसामने; अमित शाह म्हणाले, “तुष्टीकरण सहन करणार नाही”
- ‘लाडक्या बहिणींना पैसे मिळत राहणार’; देवेंद्र फडणवीसांनी दिलं स्पष्ट उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











