Jitendra Awhad | “चंद्रकांत पाटलांची भेट मारूतीराया घेणार आणि…”; जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Jitendra Awhad | मुंबई :  भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या विधानानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत असतानाच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्त सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी शिवरायांबद्दल केलेलं विधान चर्चेत आलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली असल्याचं ते म्हणाले होते.

हे प्रकरण मिटत नाही तोवरच चंद्रकांत पाटील यांनी देखील चुकीचं विधान केल्याने यात भर पडली. कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. अशातच आता राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते वादात सापडले आहेत.

“आपला कुठलाच देव बॅचलर नाही, महापुरूषही बॅचलर नाही” असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. यावर राजकीय स्तरातून प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. ट्विट करत आव्हाडांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधलाय.

“आपला एकही देव बॅचलर नाही असं चंद्रकांतदादांनी म्हणताच इंद्रलोकात भुवया उंचावल्या आणि सगळ्यांनी मारुतीकडे पाहण्यास सुरूवात केली आणि मारुतीला चंद्रकांत पाटील यांचं म्हणं ऐकवलं. मारुतीने निर्णय घेतला आहे की लवकरच चंद्रकांतदादांची भेट घेऊन ते बॅचलर आहेत की नाही यावर सविस्तर चर्चा करणार. संसार करून पण सगळं करता येतं असं महापुरुष आणि देवांना उद्देशून चंद्रकांत दादांनी म्हटलं आहे. त्यावर आता रामदास स्वामी काय उत्तर देणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत”, असं खोचक ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य काय?

“आपला कुठलाही देव बॅचलर नाही. आपले कुठलेही महापुरूष बॅचलर नाहीत. संसार करून सगळं करता येतं. सेवाही करता येते.जगात असा कुठलाही माणूस नाही ज्याचं रक्त हिरवं किंवा निळं आहे. देवाने माणसाला घडवताना कुठलाही भेद केला नाही. सगळ्यांना सारखंच बनवून पाठवलं. सगळ्यांना दोन कान, दोन डोळे आणि समान शरीर देवाने दिले आहे. माणसाचा जन्म हा स्पर्मपासून होतो. स्पर्म कुणाला दिसत नाही. तो स्पर्म 100 किलोचा माणूस तयार करतो. तो माणूस कसा आहे हे ठरवतो. त्या स्पर्ममधून माणूस निर्माण करणारा कुणीतरी आहे ना? सगळी माणसं त्याने बनवली आहेत. इंग्रज आले आणि आपली संस्कृती बदलली. आईला मम्मी आणि वडिलांना पप्पा म्हणायाला लागलो. आपली संस्कृती विसरलो”, असे चंद्रकांत पाटील Chandrakant Patil  म्हणाले आहेत.

 महत्वाच्या बातम्या :