Uddhav Thackeray | राज्यात आता एक जुगार बचाव मंत्रालय सुरू तर होणार नाही ना? ठाकरे गटाचा भाजपवर हल्लाबोल

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांचा एक फोटो ट्विट केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.

या फोटोच्या माध्यमातून संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे मकाऊमध्ये कॅसिनो खेळत असल्याचा दावा केला होता. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं ( Uddhav Thackeray ) पुन्हा एकदा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपवर सामना अग्रलेखाच्या माध्यमातून शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

भाजपचे कुळे यांची ‘मुळे’ मकाऊच्या कॅसिनो महालात पोहोचली. याचे समर्थन आज भाजपचे दुधखुळे करीत आहेत. मकाऊच्या कुळ्यांची पाठराखण करण्यासाठी इतरांवर बदनामीचे शेण उडवून धमक्या वगैरे दिल्या जात आहेत.

पण भाऊ एक मात्र नक्की, या लोकांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा मकाऊछाप जुगार करून राज्य बदनाम केले. कुळे येतील, कुळे जातील. त्यांच्या समर्थनार्थ झांजा वाजवणाऱ्यांनो, जो बुंदसे गयी वो हौदसे नही आती!

महाराष्ट्रात आता एक जुगार बचावो मंत्रालय सुरू तर होणार नाही ना? भाजपच्या अमृतकाळात दहीही घडू शकते, असं आजच्या सामना अग्रलेखात ( Uddhav Thackeray ) म्हटलं आहे.

Read Samana Editorial

गेल्या आठ-दहा वर्षांत भारतीय राजकारणाचे गजकर्ण झाले आहे व गजकर्णाचा हा मूळ किडा भाजपचे राज्य देशात आल्यापासून वळवळू लागला आहे.

राजकारणाचा स्तर गेल्या आठ-दहा वर्षांत किती घसरला हे पाहायचे असेल तर सध्या पाच राज्यांत सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांतील भाषणे समजून घ्यायला हवीत. इतरांचे ठीक आहे, पण पंतप्रधान आणि गृहमंत्री पदावरील व्यक्तीने तरी संयमाने आणि भान राखून बोलायला हवे.

राजकीय विरोधकांवर घसरायचे म्हणजे किती घसरायचे? एकंदरच सध्याच्या राजकारणात एकाला झाकावे आणि दुसऱ्याला काढावे अशी गत झाली आहे.

सध्याचे राज्यकर्ते मात्र स्वतचे झाकून दुसऱ्याचे वाकून पाहण्यात मग्न आहेत. महाराष्ट्र हे कधीकाळी सुसंस्कृत राजकारणाचे आदर्श राज्य होते. आता येथेही सब घोडे बारा टके अशीच स्थिती झाली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. हे महाशय उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ), शरद पवारांपासून अनेक ज्येष्ठ, श्रेष्ठ नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन बोलतात व असे बोलणे ही एक विकृती आहे, असे राज्यातील देवेंद्र फडणवीस वगैरे लोकांना वाटत नाही.

त्याच बावनकुळ्यांचा एक ‘बावनपत्ती’ फोटो समाजमाध्यमांवर झळकताच भाजपच्या गोटात छाती पिटण्याचा हुकमी कार्यक्रम सुरू झाला. तो अद्याप संपलेला नाही.

महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाचे हे अध्यक्ष सुध्या चीनचा प्रदेश ‘मकाऊ’ येथे सहकुटुंब असल्याचे प्रदेश भाजपने जाहीर केले. ‘कुळे’ हे त्यांच्या कुटुंबासोबत कोठे असावेत हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न. पण कुळे हे मकाऊच्या एका हॉटेलातील ‘कॅसिनो’मध्ये मस्त बसून द्युत खेळात दंग असल्याचे हे छायाचित्र मनोरंजक आहे.

कुळे यांच्या टेबलवर ‘पोकर्स’ नामक जुगारात खेळले जाणारे चलन विखुरले आहे व त्यांना त्यांच्या चिनी मार्गदर्शक कुटुंबाने घेरले आहे. कुळे यांनी त्या खेळात त्या क्षणी किती ‘आकडा’ लावला आहे तो त्यांच्या टेबलावरील स्क्रीनवर झळकला आहे.

हे छायाचित्र प्रसिद्ध होताच भाजपास इतके हडबडून जायचे कारण नव्हते. ‘छे, छे! आमचे प्रदेशाध्यक्ष बसले आहेत तो जुगाराचा अड्डा नव्हेच. ते तर त्यांच्या कुटुंबासह मकाऊ नगरीत पर्यटनास व श्रमपरिहारास गेले आहेत’ त्यानंतर कुळे यांनी स्वत केलेला खुलासा तर बुडत्याचा पाय खोलात अशा पद्धतीचा आहे. ‘छे, छे!

माझा आणि त्या जुगाराच्या हॉलचा संबंध नाही. मी तर ते एक रेस्टॉरंट समजून खाण्यापिण्यासाठी गेलो.’ त्या छायाचित्राचा इतका धसका घेण्याचे व त्यानंतर आव्हान-प्रतिआव्हान देण्यासाठी नेपाळी बेडकांना सोडण्याचे कारण काय?

मकाऊ, बँकॉक, मालदीव, मॉरिशस, मलेशिया वगैरे देशांतील जीवन पद्धती वेगळी आहे व तेथे जगभराच्या पर्यटकांची ओढ आहे. वाळवंट आणि चिखलाचे एके काळी साम्राज्य असलेल्या ‘मकाऊ’वर आज चीनचा कब्जा आहे व पर्यटन, कॅसिनोच्या माध्यमातून चीनने तेथे जगभराच्या पर्यटकांना आकर्षित करून मोठाच आर्थिक लाभ मिळवला आहे.

मकाऊ नगरी देखणी व नीटनेटकी आहे. कॅसिनो हे तिथले मुख्य अकिर्षण आहे व या मायानगरीचा अनुभव तेथे जाणारे सगळेच जण घेतात. त्यात काही अपराध आहे असे मानायचे कारण नाही.

भारताच्या भूमीवर गोव्याच्या समुद्रात असे कॅसिनो जहाजांवर आहेत. भारतीय जनता पक्षाने आधी या कॅसिनो संस्कृतीला विरोध केला. मनोहर पर्रीकरांच्या नेतृत्वाखाली गोव्यात कॅसिनोविरोधात आंदोलने झाली.

‘भाजपचे राज्य गोव्यात आले तर कॅसिनो बंद करू. हिंदू संस्कृतीवर जुगाराचे आक्रमण होऊ देणार नाही,’ असे सांगितले. पण गोव्यात सत्ता येताच

कॅसिनो बंद करायचे राहिले बाजूला, उलट त्याच कॅसिनोंचा जुगारी मलिदा खाऊन भाजप तेथील राजकारणात तरारून फुगला, सुजला व माजला.

आता कॅसिनोचा मलिदा हेच त्यांचे पूर्णब्रह्म बनले आहे. कॅसिनोवाल्यांच्या पैशांवर भाजप निवडणूक लढवतो व आमदारांची खरेदी-विक्री करून सत्ता कमावतो.

इतका सरळसोट व्यवहार असताना महाराष्ट्राच्या बावनकुळय़ांना कॅसिनोत गेले म्हणून अपराधी वाटण्याचे कारण काय? महाराष्ट्रात सध्या नशेचा जोरदार व्यापार सुरूच आहे. त्याच्या जोडीला ‘कॅसिनो’चा जुगार सुरू करता येईल काय?

याचा अभ्यास करायला ते तेथे गेले असतील तर मग त्यांच्या माघारी राज्यातील भाजप प्रवक्त्यांना खुलाशांमागून खुलासे करण्याची गरज का पडावी?

अर्थात कुळ्यांच्या जागी भाजपविरोधी एखादा नेता असता तर अशा फोटोवरून फडणवीसांपासून बावनकुळ्यांपर्यंत सळ्यांनी एकजात नैतिकता, संस्कृती बुडाल्याचा छातीठोक तोफखानाच सोडला असता व संबंधित चित्रातील महनीय व्यक्तीवर ईडी, सीबीआय चौकशीचा ससेमिरा लावून चौकशी पूर्ण होण्याआधीच बदनामीच्या फासावर लटकवून हे लोक मोकळे झाले असते.

भाजपचे कुळे यांची ‘मुळे’ मकाऊच्या कॅसिनो महालात पोहोचली याचे समर्थन आज भाजपचे दुधखुळे करीत आहेत. मकाऊच्या कुळ्यांची पाठराखण करण्यासाठी इतरांवर बदनामीचे शेण उडवून धमक्या वगैरे दिल्या जात आहेत.

पण भाऊ एक मात्र नक्की, या लोकांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा मकाऊछाप जुगार करून राज्य बदनाम केले. कुळे येतील, कुळे जातील.

त्यांच्या समर्थनार्थ झांजा वाजवणाऱ्यानो, जो बुंदसे गयी वो हौदसे नही आती! महाराष्ट्रात आता एक जुगार बचावो मंत्रालय सुरू तर होणार नाही ना? भाजपच्या अमृतकाळात काहीही घडू शकते.

सौजन्य – सामना

महत्त्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.