Uddhav Thackeray | सध्याचं शासन श्रीरामाचा गजर करत सरकारी प्रमोशन करतंय; ठाकरे गटाचा हल्लाबोल

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: आज देशामध्ये विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जात आहे. या दिवशी प्रभू श्रीरामाने रावणाचा वध करत अहंकारावर विजय मिळवला होता.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं आजचा सामना अग्रलेखाच्या माध्यमातून सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. दसरा हा मंगलमय सण, पण महाराष्ट्राचे अमंगल करणारे एक बेकायदेशीर, घटनाबाहय सरकार शिवरायांच्या महाराष्ट्रावर मोदी-शहांनी लादले आहे.

सत्तेचा माज व अहंकार अशाच पद्धतीने रावणाच्या नसानसांत उसळत होता. त्या अहंकाराचा नाश शेवटी दसऱ्याच्या दिवशी झाला. तेव्हापासून विजयादशमीचा उत्सव साजरा होत आहे.

घटनाबाहय, अहंकारी रावणाचा नाश होईल या जिद्दीने मराठी जनतेची मने व मनगटे तापली आहेत. शिवतीर्थावर ‘राम-लीला’ साजरी होईल. अहंकारी रावणाचे दहन होईल, महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त होईल व भारत देश सूडाच्या फासातून मुक्त होईल.

महाराष्ट्राच्या जनतेने अहंकाराचा कोथळा काढण्यासाठी ‘राघनखे’ चढवली आहेत. आजच्या दसऱ्याचे हेच महत्त्व आहे. विजयादशमीच्या लाख लाख शुभेच्छा, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

Read Samana Editorial

‘दसरा सण मोठा’ असे गवने म्हटले जाते तो दसरा आज साजरा होत आहे. श्रीरामाने रावणावर विजय मिळवला तोच हा दिवस. भगवान रामाने रावणाचा वध करण्यासाठी चंडी देवीची पूजा केली.

ती चंडी म्हणजे दुर्गा, रामाने युद्ध जिंकले म्हणजेच रावणाच्या अहंकाराचा नाश केला, त्याचा अभिमान मोडला. रावणाकडे सोन्याच्या विटा म्हणजे सोन्याचे खोके होते. ते खोकेही त्याला वाचवू शकले नाहीत हेच खरे दसऱ्याचे महत्त्व आहे.

आज महाराष्ट्रात दसरा साजरा होत असताना राज्याची स्थिती काय आहे? श्रीराम नाशकातील पंचवटीत वास्तव्यास होते. रामस्पशनि ती भूमी पवित्र झाली, पण त्या पंचवटीत आज राजकीय आशीर्वादाने ‘ड्रग्ज’ म्हणजे अमली पदार्थांचा मोठा व्यापार चालतो.

गेल्या काही महिन्यांपासून ‘पंचवटी’ या नशेच्या व्यापाराने बदनाम झाली शेकडो कोटींचे अमली पदार्थ जप्त झाले. हे अमली पदार्थ रामाच्या पंचवटीत आले कोठून?

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे नवरात्रीच्या उत्सवांना गेले व म्हणाले, “या देशातील बच्चा बच्चा श्रीराम म्हणेल!” देवेंद्रजी, या देशातील बच्चा बच्चा श्रीरामाचा गजर करीलच, त्यासाठी तुमची गरज नाही, पण अमली पदार्थांचा ‘रावण’ या तरुणांचा नाश करीत आहे.

त्या रावणाचा वध तुम्ही का करीत नाही? पंचवटीसह संपूर्ण राज्यात अमली पदार्थांचा रावण हैदोस घालीत आहे व तुमचे सरकार त्या रावणाकडून फक्त वसुली करीत आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे हे चित्र आहे.

दसऱ्याच्या पूर्वसंध्येस संभाजीनगरात अडीचशे कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. कोकेन, मेफेड्रोन असा मोठा साठा गुजरातमधून मुंबईस येत होता. तो संभाजीनगरात पकडला. आता पालघर जिल्हयातही ड्रग्जचा कारखाना असल्याचे उघड झाले आहे. मुख्य म्हणजे मोखाडा तालुक्यात एका फार्म हाऊसवर हा कारखाना सुरू होता.

मीरा-भाईंदर गुन्हे शाखेने धाड घालून तेथून कोटयवधींचा मुद्देमाल जप्त केला आणि एकाला अटक केली असे सांगण्यात येत आहे. अहमदाबाद एक्प्रेसमधूनही रविवारी काही लाखांचा गांजा जप्त करण्यात आला.

परिस्थिती एवढी गंभीर असली तरी राज्यातील मिंधे सरकारला त्याची फिकीर नाही. त्यांना चिंता आहे ती ‘बीअर’चा खप राज्यात कसा वाढवता येईल याची वाढीव उत्पादन शुल्कामुळे म्हणे बीअरचा खप घटला आहे आणि सरकारचा महसूल बुडत आहे.

त्यामुळे उत्पादन शुल्कात कपात करून बीअर कशी स्वस्त करता येईल आणि बीअरचा खप कसा वाढवता येईल याचा अभ्यास करण्यासाठी थेट एक अभ्यास गटच मिंधे सरकारने स्थापन केला आहे.

तरुणांच्या हातात रोजगाराऐवजी बीअरची बाटली सोपविणारे हे सरकार आहे. एकीकडे श्रीरामाचा गजर करा सांगायचे आणि दुसरीकडे बीअरचे ‘सरकारी प्रमोशन’ करायचे. श्रीरामाचा गजर करा हे सांगणाऱ्यांच्या राज्यात हा असा नशेचा बाजार सुरू आहे.

महाराष्ट्रातील तरुणांची निराशा वाढत आहे. त्यांना रोजगार नाही. रोजगार नाही म्हणून मग नशा व त्यातून आत्महत्या. मराठा, धनगर समाजाची ‘आरक्षण’ आंदोलने त्याच वैफल्यातून खदखदत आहेत.

महाराष्ट्र कधी नव्हे इतका जातीपातीत फाटला आहे. मराठा-मराठेतर, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, घाटी-कोकणी, शहाण्णव कुळी ब्याण्णव कुळी, स्पृश्य-अस्पृश्य असे भेदाभेद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले व ते विचार कृतीत उतरवले; पण आज मराठा विरुद्ध धनगर, ओबीसी, दलित असे सगळेच एकमेकांविरुद्ध मांडयावर थाप मारून उभे ठाकले.

महाराष्ट्राचे पुरोगामित्व, एकजिनसीपणा यामुळे संपला. महाराष्ट्राची एकजूट तोडण्याचे काम 2014 पासून सुरू झाले. त्याच कारस्थानाचा भाग म्हणून शिवसेना तोडली गेली, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फोडला गेला व मिथ्या लाचार बुळचटांच्या हाती महाराष्ट्र सोपवून भाजपने नवी फडणविशी सुरू केली.

महाराष्ट्राचे शौर्य, मर्दानगी, स्वाभिमान मारून शिवरायांच्या महाराष्ट्रास ‘लाचार’ बनवायचे हे धोरण अमलात आणले आहे. आता म्हणे, छत्रपती शिवरायांची ‘वाघनखे’ तीन वर्षांच्या कंत्राटावर, भाडेतत्वावर इंग्लंड येथून आणली जात आहेत.

इतिहासकार व शिवरायांच्या वंशजांच्या मनात या ‘वाघनखां’ विषयी शंका आहेत, पण काही कोटी रुपये जनतेच्या तिजोरीतून खर्च करून ही वाघनखे आणली जात आहेत.

रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, अशी शिवरायाची आज्ञा होती, पण येथे वाघनखांवर शिवरायांच्या नावाने कोटयवधी रुपये लंडनमधील एका म्युझियमला दिले. शिवरायांच्या नावाने केलेला हा घोटाळा आहे.

महाराष्ट्रात फसवाफसवी आणि राजकीय दरोडेखोरीचे प्रकार राजरोस सुरू आहेत. दसरा हा मंगलमय सण, पण महाराष्ट्राचे अमंगल करणारे एक बेकायदेशीर, घटनाबाहय सरकार शिवरायांच्या महाराष्ट्रावर मोदी-शहांनी लादले आहे.

हे बेकायदेशीर सरकार वर्षभर महाराष्ट्राच्या बोकांडी बसले आहे व त्यांना संरक्षण देण्याचे काम भाजपचे दिल्लीश्वर आणि महाराष्ट्रातील विधानसभा अध्यक्ष करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा मानायला हे तयार नाहीत.

सत्तेचा माज व अहंकार अशाच पद्धतीने रावणाच्या नसानसांत उसळत होता. त्या अहंकाराचा नाश शेवटी दसऱ्याच्या दिवशी झाला. तेव्हापासून विजयादशमीचा उत्सव साजरा होत आहे.

घटनाबाहय अहंकारी रावणाचा नाश होईल या जिद्दीने मराठी जनतेची मने व मनगटे तापली आहेत. शिवतीर्थावर ‘राम-लीला’ साजरी होईल. अहंकारी रावणाचे दहन होईल, महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त होईल व भारत देश सूडाच्या फासातून मुक्त होईल.

पांडवांनी शमीच्या झाडावरील शस्त्रे काढली. तोच आजचा दिवस. महाराष्ट्राच्या जनतेने अहंकाराचा कोथळा काढण्यासाठी ‘वाघनखे चढवली आहेत. आजच्या दसयाचे हेच महत्त्व आहे. विजयादशमीच्या लाख लाख शुभेच्छा!

सौजन्य – सामना

महत्त्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe