Supriya Sule | भाजपला सामान्य जनतेचे आणखीन किती बळी हवे? – सुप्रिया सुळे

Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय, नांदेड या ठिकाणी 24 तासात 24 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात देखील दिसून आले आहे.

अशात आता या प्रकरणावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारवर खोचक शब्दात टीका केली आहे. भाजपा सरकारला सामान्य जनतेचे आणखी किती बळी हवे आहेत? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

How many more victims of the common people does the BJP government want? – Supriya Sule

ट्विट करत सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “भाजपा सरकारला सामान्य जनतेचे आणखी किती बळी हवे आहेत? आरोग्याशी संबंधित यंत्रणेत प्रचंड अनागोंदी कारभार सुरु असताना राज्यकर्ते हात बांधून स्वस्थ बसले आहेत.

संवेदनशील राज्यकर्त्यांनी आतापर्यंत संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घेतला असता‌. नांदेड, ठाणे येथील रुग्णांच्या मृत्युंचे प्रकरण ताजे असतानाच छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात एकाच दिवशी दहा रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले, तर नांदेडच्या त्याच रुग्णालयात आणखी सात रुग्णांचा मृत्यू झाला असून ही संख्या आता २४ वरुन ३१ झाली आहे.

हे सर्वजण सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष व निष्काळजीपणाचे बळी आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोग्य व्यवस्थेमध्ये अनागोंदी कारभार दिसत असूनही यावर उपाययोजना करण्याची शासनाची मानसिकता दिसत नाही.

मुख्यमंत्र्यांनी तातडीने संबंधित मंत्र्यांचा राजीनामा देऊन आरोग्यव्यवस्थेचा आढावा घेणे आवश्यक आहे. मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांना भावपूर्ण श्रद्धांजली, या रुग्णांच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.”

दरम्यान, या प्रकरणावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. ते म्हणाले, “कालच नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचं थैमान झाल्याची भीषण घटना घडली असताना, आज तसाच भयानक प्रकार छत्रपती संभाजीनगर मधल्या घाटी रुग्णालयात घडल्याचं समोर येतंय.

२ बालकांसह ८ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नांदेडच्या रुग्णालयातही अजून ७ मृत्यू झाल्याचं समजतंय. हे सगळं भयानक आहे. शासकीय रुग्णालय हा मृत्यूचा सापळा बनलाय का अशी शंका येतेय.

महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्था ह्या भ्रष्ट मिंधे-भाजपा सरकारच्या काळात कोलमडून गेल्याचं ढळढळीतपणे दिसतंय. लोकांच्या जीवाची ह्यांना पर्वा नाही, परिस्थितीचं गांभीर्य नाही. अश्यांना सत्तेच्या खुर्चीत बसून महाराष्ट्र सांभाळण्याचा हक्कच नाही!”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.