Narayan Rane | “साहेब, मला क्षमा करा!” बाळासाहेबांच्या जयंतीदिनी नारायण राणेंचं भावनिक पत्र

Narayan Rane | मुंबई : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज जयंती आहे. या जयंतीनिमित्ताने अनेक राजकीय नेत्यांकडून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले जात आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनीही बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं आहे. त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करून बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

“तुम्ही आजारी असताना मला तुम्हाला भेटायचं होतं. तुम्हाला शेवटचं पाहायचं होतं. पण साहेब, मी तुम्हाला शेवटचा नमस्कारही करू शकलो नाही. मला क्षमा करा”, असं भावनिक पत्रच नारायण राणे यांनी लिहिलं आहे. राणे यांचं हे पत्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.

“बाळासाहेब अतिशय दयाळू स्वभावाचे होते. ते पक्के राजकारणी कधीच नव्हते. आपलं माणूसपण त्यांनी शेवटपर्यंत जपलं. आपल्या तीक्ष्ण बुद्धीनं आणि परोपकारी स्वभावामुळे त्यांना समाजाच्या घटकातून मित्र आणि अनुयायी लाभले. १९६६ मध्ये मराठी माणसाची एकमेव आशा म्हणून त्यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि नंतर त्यांनी कडव्या हिंदुत्त्वाचा पुरस्कार केला. त्यामुळेच मराठी माणूस आणि माझ्यासारखे तरूण त्यांच्याकडे चुंबकासारखे आकर्षित झाले होते. पक्ष चालवताना आपल्या पक्षाच्या माणसांवर ते प्रेमाचा जो वर्षाव करत आणि जो विश्‍वास दाखवत, त्यामुळे ती माणसं त्यांच्यासाठी जिवावर उदार व्हायलाही मागेपुढे पहात नसत. त्यांनी आपल्या माणसांची नेहमीच काळजी घेतली. दुःखाच्या प्रसंगी विचारपूस करायला ते कधीही विसरले नाहीत. अशा वागणुकीमुळेच ते आपल्या पक्षाचेच नाही, तर अवघ्या महाराष्ट्राचे लाडके नेते होते”, असेही नारायण राणे म्हणाले आहेत.

“शेवटच्या काळात बाळासाहेब आजारी असताना त्यांना भेटण्यासाठी…त्यांना शेवटचे पाहण्यासाठी मनाची कशी घालमेल झाली होती. आपण कसे अस्वस्थ झालो होतो”, असे म्हणत नारायण राणे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. यावर आता शिवसेनेच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.