Raj Thackeray | “टिळकांचे आणि गांधीजींचे वैचारिक मतभेद होते, मात्र…”; राज ठाकरेंचा मोदी-पवारांना टोला

Raj Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार एकाच मंचावर दिसणार आहे.

शरद पवारांनी (Sharad Pawar) मोदींच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, असं मत महाविकास आघाडीतील नेत्यांनी मांडलं आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

ट्विट करत राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची पुण्यतिथी. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे दोन ठळक कालखंड ठरवायचे झाले तर अर्थात पहिलं, ‘टिळक युग’ आणि दुसरं ‘गांधी युग’ असं करता येईल.

१९०० ते १९२० ह्या संपूर्ण कालखंडावर टिळकांचा एकूणच भारतीय सार्वजनिक जीवनावर जो पगडा होता त्याची तुलना होणे शक्यच नाही. असं म्हणतात की एकदा टिळक कलकत्त्याला जायला निघाले, तर त्या प्रवासाला जवळपास ११ दिवस लागले कारण इतक्या मोठ्या संख्येने वाटेतल्या प्रत्येक शहरांत टिळकांचं दर्शन घ्यायला, त्यांना भेटायला लोकांची गर्दी जमत होती.

तेव्हा खंडप्राय भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचलेला आणि मान्यता मिळवलेला हा बहुदा एकमेव मराठी नेता. ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे….’ असं म्हणणाऱ्या टिळकांच्या स्वराज्याबद्दलच्या कल्पना सुस्पष्ट होत्या.

त्यांच्या केंद्रीय सत्तेबाबतच्या मांडणीत भाषिक प्रांतरचनेचं महत्व आणि संघराज्यांना संपूर्ण स्वायत्तता ह्या बाबींना मध्यवर्ती स्थान होते. लोकमान्यांच्या ह्या विचाराचं स्मरण, पुरस्काररुपी आशीर्वाद मिळणाऱ्यांना असेल असं मी मानतो.”

Lokmanya Tilak had philosophical differences with contemporary leaders – Raj Thackeray 

“लोकमान्य टिळकांचे समकालीन नेत्यांशी तात्विक मतभेद होते पण त्यांनी ते मतभेद राष्ट्रहिताच्या आड येऊ दिले नाहीत. तसंच मतभेद आहेत म्हणून समोरच्याचं संपूर्ण चारित्र्यहनन करणं हे त्यांच्या कधीही ध्यानीमनी नव्हते.

महात्मा गांधीजींचे आणि त्यांचे तात्विक मतभेद झाले पण त्यांनाही टिळकांबद्दल नितांत आदर होता आणि आपल्याला त्या पार्श्वभूमीवरच पुढे जायचं आहे ह्याचं भान होतं.

तसंच टिळकांना देखील उद्याच्या भारतात गांधी हे राष्ट्रनेते ठरू शकतील ह्याची जाणीव होती आणि त्यासाठी टिळकांनी गांधीजींशी कोणतेही वैचारिक मतभेद सार्वजनिक चर्चेचा विषय होऊ दिले नाहीत.

आज महापुरुषांच्या चारित्र्यहननाच्या काळात टिळकांचा ह्या विचारला पुन्हा उजाळा मिळायला हवा. रवींद्रनाथ टागोरांनी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारावं असा आग्रह टिळकांनी धरला होता.

ह्यातून राजकारणात फक्त राजकीय आदर्श पुढे येण्याऐवजी प्रतिभाशक्तीचा आदर्श पण यावा असा आग्रह धरणारे टिळक हे खऱ्या अर्थाने द्रष्टे म्हणावे लागतील, ते ह्यासाठी की सद्य परिस्थितीत, ‘सत्तेसाठी वाट्टेल ते’चे आदर्श उभे राहात असताना, प्रतिभा आणि संस्कृती किती महत्वाची आहे ह्याची जाणीव त्यांना होती. ह्या लोकमान्य कर्मयोग्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनम्र अभिवादन”, असही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.