Chandrakant Patil | ठाकरे-आंबेडकरांच्या युतीबाबत चंद्रकांत पाटलांचं ‘ते’ वाक्य ठरलं खरं??

Chandrakant Patil | मुंबई : प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने चार दिवसांपूर्वीच युतीची घोषणा केली आहे. या युतीला चार दिवसही होत नाही तोच दोन्ही पक्षातील मतभिन्नता आणि शाब्दिक कलह सुरु असल्याचं समोर आलं आहे. ठाकरे आणि आंबेडकर यांच्या युतीनंतर ही युती किती काळ टिकणार? वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सामिल होणार का? आंबेडकर आणि शरद पवार यांच्यातील वाद शांत होतील का?, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

ठाकरे- आंबेडकरांच्या या युतीवर विरोधकांकडून चांगलीच टीकेची झोड उठवली जात होती. अशी परिस्थिती असतानाच युतीमध्ये मत-मतांतर असल्याचे दिसून आले. भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी युतीवर टीका करताना ‘त्यांची युती किती काळ टिकेल, हा येणारा काळच ठरवेल. याचा दोघांना फायद होईल की त्याचा तोटा, पुढील काळात स्पष्ट होईल. किती काळ ते एकत्र राहणार? एकत्र येणं आणि भ्रमनिरास होणं हा इतिहास आहे’ असे म्हणाले होते.

त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे भाजपचेच असल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रकाश आंबेडकर यांचा हा आरोप ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी फेटाळून लावला आहे.

संजय राऊतांनी फटकारलं

“प्रकाश आंबेडकर यांचा आरोप गंभीर आहे. पण आम्ही त्यांच्या वक्तव्याशी सहमत नाही. आंबेडकर यांनी जुन्या गोष्टी विसरून आघाडी मजबूत करावी”, अशा शब्दात संजय राऊत यांनी आंबेडकर यांना फटकारले आहे. राऊत माध्यमांशी बोलत होते.

“चार दिवसांपूर्वीच शिवसेना आणि वंचित आघाडीची युती झाली आहे. पण, प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीबद्दल वक्तव्य करणे आम्हाला मान्य नाही. शरद पवार महाराष्ट्र आणि देशाचे उत्तुंग नेते आहेत. शरद पवार भाजपबरोबर आहेत, असं म्हणणं त्यांच्या कारकीर्दीवर मोठा आरोप आहे,” अशा शब्दांत संजय राऊतांनी खडेबोल सुनावले आहेत.

दरम्यान, ठाकरे आणि आंबेडकरांच्या युतीमधला वाद चार दिवसांतच असा समोर आल्याने ही युती जास्त काळ टिकणार नाही असे चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य खरे ठरते का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :