Sharad Pawar – घरामध्ये प्रत्येकाला माहीत, पक्ष पुढे कसा जाणार – शरद पवार

Sharad Pawar – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादीतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या विनंतीला मान देत राजीनामा मागे घेतला आहे. त्यांच्या या निर्णयावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलेल्या राजीनाम्याला भाजपने नौटंकी असं म्हटलं होतं. त्याचबरोबर संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून टीका केली होती.  पवार वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरले आहे, अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली होती.

या सर्व आरोपांवर शरद पवारांनी सातारा इथे पत्रकारांशी संवाद साधला. भाजप तसेच संजय राऊत यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

शरद पवार यांच्या राजीनाम्याला भाजपने नौटंकी म्हटलं

शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलेल्या राजीनाम्याला भाजपने नौटंकी असं म्हटलं होतं. या प्रतिक्रियेवर उत्तर देत शरद पवार यांनी भाजपवर टीकास्त्र चालवलं आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “भाजपला टीका करू द्या, आम्ही काम करतो. आम्ही आमच्या कामाच्या माध्यमातून पक्षाचा विस्तार करू.”

पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली

नागपूरवरून जो संदेश येईल तो शिंदेंना मानावा लागतो असं म्हणत पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. सत्ता मिळाली नाही किंवा लोकांनी नाकारले, तर सत्ता आणि संपत्तीचा वापर करून लोक फोडायचे नसतात सत्ता कमवायची असते, असं देखील ते यावेळी म्हणाले.

Sharad Pawar Comment On Sanjay Raut

दरम्यान, संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून केलेल्या टीकेवर शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केलं आहे. पवार वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरले आहे, अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली होती. त्यावर प्रतिक्रिया देत पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे मला राजीनामा मागे घ्यावा लागला. आम्ही पक्षात काय करतोय याबद्दल राऊतांना माहिती नाही. आम्ही कुणाला संधी दिली आणि आम्ही काय केलं हे जाहीर करत नाही. त्यामुळे कुणी आमच्यावर टीका केली तर आम्ही दुर्लक्ष करतो.”

शरद पवारांची फेसबुक पोस्ट -Sharad Pawar Facebook Post 

घरामध्ये आमच्यातील प्रत्येक सहकाऱ्याला माहीत आहे की, आपला पक्ष पुढे कसा जाणार आहे. नेतृत्वाची फळी पक्षामध्ये कशी तयार केली जाणार याची खात्री पक्षातील सर्व सहकाऱ्यांना आहे. १९९९ साली आम्ही सत्तेत आलो तेव्हा आम्हाला मंत्रिमंडळ तयार करायचे होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे संयुक्त मंत्रिमंडळ होते. त्या मंत्रिमंडळात जयंतराव पाटील, अजितदादा पवार, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, आर. आर. पाटील अशी अनेक नावं होती ज्यांची ती पहिली टर्म होती. त्यांची नियुक्ती केली. मी जेव्हा मंत्रिमंडळात गेलो तेव्हा मला पहिले राज्यमंत्री पद मिळाले. काही वर्षे राज्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर मला प्रमोशन मिळाले. पण आता मी जी नावं घेतली त्या सर्वांची कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि महाराष्ट्राने बघितले की त्या प्रत्येकाने आपले कर्तृत्व सिद्ध केले. याबद्दल कोणी काय लिहिले याचे महत्त्व आमच्या दृष्टीने नाही. त्यांचा लिहिण्याचा अधिकार आहे. आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. आम्ही काय करतो आम्हाला ठाऊक आहे व त्यात आम्हाला समाधान आहे. राष्ट्रीय पक्षांच्या धोरणामध्ये प्रत्येकाची भूमिका सहकारी पक्षाबरोबर १०० टक्के जुळेल असं कधी होत नाही. काही गोष्टी पुढे-मागे असतात, काही मतं वेगळी असतात. त्याबद्दल आमच्यात गैरसमज नाही. त्यामुळे महाविकास आघाडीवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोणत्याही मित्रपक्षाशी संपर्क केलेला नाही. याचे कारण म्हणजे आम्हाला शून्यातून सुरुवात करायची होती. ज्यावेळी विविध पक्षांसोबत एकत्रित निवडणूक लढवण्याची भूमिका घ्यायची असते तेव्हा त्या मित्रपक्षाला आपण काही शक्ती देण्याची खात्री द्यावी लागते. आम्ही कर्नाटकात सुरुवात करत असल्याने अशी खात्री देणे योग्य होणार नाही. मर्यादित जागेवर निवडणूक लढवत असल्याने याचा वाईट असा परिणाम काँग्रेसवर होणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे.

निवडणुकीचा फॉर्म भरताना लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता यावर विश्वास आहे, अशी शपथ घेतली जाते. ही शपथ घेतल्यानंतर धर्माच्या आणि जातीच्या नावाने मतं मागणे म्हणजे त्या शपथेचा भंग आहे. मला गंमत वाटते की, देशाचे प्रधानमंत्री या प्रकारची भूमिका लोकांसमोर मांडतात. तुमच्या हाती सत्ता असताना काय केले हे सांगणे गरजेचे आहे.

दुर्दैवाने अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. पंचनामे झाले असले तरी दोन आठवडे उलटूनदेखील शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे मदतीसाठी लोक अस्वस्थ आहेत. असे संकट आल्यानंतर पक्ष वगैरे न पाहता राज्य सरकारने सर्वांना सोबत घेऊन ते प्रश्न सोडवायला हातभार लावावा. त्याशिवाय गत्यंतर नाही.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.