पंकजा मुंडेंना ज्योती मेटेंच्या उमेदवारीची भीती? मराठा उमेदवाराचे आव्हान पंकजा यांना कसे पेलणार?

Beed Loksabha Election 2024 Pankaja Munde vs Jyoti Mete

बीड : Beed LoksabhaPankaja Munde vs Jyoti Mete । जातीचे समीकरणे महत्त्वाचे ठरणाऱ्या बीड लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून पंकजा मुंडे (Pankaja Munde ) यांची उमेदवारी घोषित करण्यात आली असली तरी त्यांना शिवसंग्रामच्या नेत्या ज्योतीताई मेटे यांच्या उमेदवारीची भीती असल्याचे बोलले जात असून मराठा महिला उमेदवाराचे आव्हान पंकजा कशा पेलणार? अशी चर्चा आता ऐकायला मिळत आहे.

मराठवाड्यातील एकमेव बीडची जागा लढवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीकडूनही डॉ. ज्योती मेटे ( Jyoti Mete ) किंवा अजित पवार गटाला राम राम ठोकून पक्षात दाखल झालेले बजरंग सोनवणे या दोघांपैकी एक उमेदवार फायनल होणार आहे. असे असले तरी पंकजा यांच्याविरोधात मराठा महिलेस उमेदवारी दिली तरच वेगळे चित्र बघायला मिळू शकते, अशीही शक्यता आहे.

बीड लोकसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षापासून खासदार राहिलेल्या प्रीतम मुंडे यांची उमेदवारी कापून त्यांच्या ज्येष्ठ भगिनी पंकजा मुंडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यानंतर जिल्हा भर वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंकजा यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे.

मागील निवडणुकीत प्रीतम मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे लढले होते. मराठवाड्यातील सर्वात लक्षवेधी असलेल्या तसेच जातीच्या अनुषंगाने लढल्या जाणाऱ्या या मतदारसंघात पंकजा यांच्या विरोधात उमेदवार कोण? असे प्रश्न उपस्थित केले जात असून याचे उत्तर येत्या दोन ते चार दिवसात मिळणार आहेत.

महाविकास आघाडीत ही जागा शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेली आहे. त्यानुसार उमेदवारांची चाचणी सुरू असतानाच पुण्यातील शरद पवारांच्या निवासस्थानी बजरंग सोनवणे यांनी प्रवेश केला आहे. तत्पूर्वी त्यांनी आपलं कुलदैवत असलेल्या जेजुरी येथे भंडारा उधळत दर्शन घेऊन जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे. त्यांच्या प्रवेशानंतर सोनवणे यांची उमेदवारी फिक्स मानली जात असली तरी अद्यापही पंकजा मुंडे यांना ज्योती मेटे याच कडवे आव्हान देऊ शकतात, असा सूर पक्षात व्यक्त होत असल्याने ऐनवेळी ज्योती मेटे यांचे नाव समोर येऊ शकते.

डॉ. ज्योती मेटे ( Jyoti Mete ) यांचे दिवंगत पती विनायक मेटे यांनी मराठा समाजासाठी गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत समाजाचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केलेले आहेत. मराठा चळवळीत त्यांनी दिलेले योगदान समाजाला विसरता येणार नाही. मागील अनेक वर्षापासून विनायक मेटे यांची मराठा चेहरा अशीच राज्यात ओळख होती.

त्यांच्या योगदानाचा पत्नी ज्योती मेटे यांना मोठा फायदा या निवडणुकीत होऊ शकतो तसेच मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभे करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला एकत्र आणले आहे. याचा देखील फायदा मेटे यांना होऊ शकतो.

जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने समाजाला फसवल्याची भावना निर्माण झालेली आहे. कुठलीही मागणी पूर्णत्वास गेलेली नसल्याने समाजाच्या मनात सरकार बद्दल संताप आहे. त्यामुळे एका जिल्ह्यात शेकडो मराठा उमेदवार उभे करण्याचा प्लॅन जरांगे पाटील समर्थक आखत आहेत.

जर बीडमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उमेदवारी डॉ. ज्योती मेटे ( Jyoti Mete ) यांना मिळाली तर मराठा समाज मोठ्या संख्येने मराठा उमेदवार उभे करण्याच्या मागणीबाबत फेरविचार करू शकतो. या सर्व गोष्टी ज्योती मेटे यांच्या पथ्यावर पडू शकतात. त्यामुळे पंकजा यांच्या गोटात भीती व्यक्त केली जात आहे.

ज्योती मेटे या स्वतः उच्चपदस्थ अधिकारी राहिलेल्या आहेत. त्यामुळे समाजाला देखील या निमित्ताने चांगला उमेदवार मिळू शकतो, अशी भावना देखील व्यक्त होत आहे. जर ज्योती मेटे यांना उमेदवारी घोषित झाली तर मराठा महिला उमेदवारांचे आव्हान पंकजा मुंडे कशा पेलणार? असा प्रश्न विचारला जात आहे.

मुंडे परिवारावर मराठा समाज नाराज आहे कारण,  प्रीतम मुंडे यांचे मराठा समाजावरील वक्तव्य. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतांना विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांनी 127 व्या घटनादुरुस्ती विधेयकावर लोकसभेत बोलताना म्हणाल्या की, प्रत्येकजण केवळ मराठा आरक्षणाबाबत बोलत आहे, मात्र ओबीसी आरक्षणाबाबत कोणी बोलत नाही, असं म्हंटल्याने मराठा समाज दुखावला गेला. मुंडे फक्त ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका घेतात मराठा आरक्षणावर बोलत नाही असा संदेश मराठा समाजामध्ये गेला होता.

याच मुख्य कारणाने प्रीतम यांची उमेदवारी रद्द करून पंकजा मुंडे यांना संधी मिळाली आहे. इच्छा नसतानाही पक्षाचा आदेश मानून पंकजा मुंडे या लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.

Beed Loksabha Election 2024 Pankaja Munde vs Jyoti Mete

बजरंग सोनवणे यांची आर्थिक क्षमता चांगली आहे त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून बीड मधील एक गट आग्रही आहे. पण निवडणूका फक्त पैशाच्या जीवावर जिंकल्या जाऊ शकत नाही याचा दांडगा अनुभव शरद पवारांना आहे. त्यामुळे शरद पवार कोणती खेळी करतात हे पाहावे लागेल.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.