Ayodhya Ram Mandir | शंकराचार्यांचे योगदान विचारणाऱ्या नारायण राणेंचे तरी योगदान काय? : अतुल लोंढे

शंकराचार्यांचा अपमान करणाऱ्या नारायण राणेंवर भाजपा काय कारवाई करणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ayodhya Ram Mandir | मुंबई, दि. १३ जानेवारी | अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम अजून पूर्ण झालेले नसतानाही भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्राणप्रतिष्ठा करण्याची घाई झाली आहे. हिंदू धर्मातील सर्वोच्च असलेल्या शंकराचार्यांनीही अर्धवट मंदिरात प्राणप्रतिष्ठा करणे चुकीचे आहे असे स्पष्ट केले आहे.

परंतु भाजपाचे लोक शंकराचार्यांवरच तोंडसुख घेऊ लागले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यात एक पाऊल पुढे टाकत शंकराचार्यांचे योगदान काय? असा प्रश्न विचारून शंकराचार्य व हिंदू धर्माचा अपमान केला आहे.

शंकराचार्यांचे योगदान विचारणाऱ्या श्रीमान नारायण राणे यांचे तरी काय योगदान? असा प्रतिप्रश्न करत राणेंचे वय पाहता त्यांनी आता वानप्रस्थाश्रमाचा मार्ग धरावा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे व भाजपाचा समाचार घेताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, नारायण राणे हे राजकीय स्वार्थासाठी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये व काँग्रेसमधून भाजपात गेले आहेत. भाजपात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करण्याशिवाय गत्यंतर नाही म्हणूनच मोदींसाठी हिंदू धर्माच्या सर्वोच्च पदावरील शंकराचार्य यांनाच तुमचे योगदान काय? असा सवाल विचारून त्यांनी सर्व मर्यादा पार केल्या आहेत.

प्रभू श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात कारण त्यांनी आयुष्यात कुठेही मर्यादेची उल्लंघन केले नाही, ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान केला नाही. श्रीराम यांना सत्ता चालून आली असतानाही त्यांनी त्या सत्तेचा त्याग करुन १४ वर्ष वनवासात घालवली. अशा मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या मंदिरासाठी शंकराचार्यांवर तोंडसुख घेणारे नारायण राणे सारखे लोक हिंदू धर्म भ्रष्ट करत असून हे लोकच हिंदु धर्माला कलंक आहेत.

Ayodhya Ram Mandir | Atul Londhe Comment On Narayan Rane

हिंदु धर्माच्या परंपरेनुसार वयाच्या ५१ ते ७५ वर्षांचा कालखंड हा वानप्रस्थाश्रमात घालवायचा असतो. या कालखंडात सर्वच क्षेत्रातून बाहेर पडून समाजोपयोगी कामे करावीत असे अपेक्षित आहे. नारायण राणे यांचे वय ७१ वर्ष आहे त्यांनी आता वानप्रस्थाश्रमाचा मार्ग धरावा असा, टोला लगावून शंकराचार्यांचा अपमान करणाऱ्या नारायण राणेंवर भाजपा कधी व काय कारवाई करणार? असा प्रश्नही लोंढे यांनी विचारला आहे.

अयोध्येत राम मंदिर व्हावे हे सर्वांची इच्छा आहे, त्याला कोणाचाच विरोध नाही. धर्म हा आस्थेचा विषय आहे राजकारणाचा नाही परंतु भारतीय जनता पक्षाने राजकारणात धर्म आणून राजकीय स्वार्थ साधण्यासाठी अर्धवट मंदिरात प्राण प्रतिष्ठा करण्याची घाई चालवली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्राणप्रतिष्ठा करुन मतांचा जोगवा मागण्यासाठी हे सर्व चालले आहे. मागील १० वर्षाताली कामांवर भाजपा मते मागू शकत नाही कारण त्यांनी लोकांना सांगावे असे काहीच केलेले नाही त्यामुळे रामाच्या नावावर मतं मागण्याचा हा खटाटोप आहे. राम मंदिरासाठी स्वतंत्र्य न्यास आहे परंतु भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा इव्हेंट बनवलेला आहे, असेही लोंढे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या