Saroj Ahire | “त्यांचं ‘हिरकणी कक्ष’ त्यांनाच लखलाभ”; विधीमंडळात मोठ्या हुरुपाने आलेल्या आमदार नाराज होऊन बाहेर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Saroj Ahire | मुंबई :  मुंबई येथे आजपासून सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिकच्या देवळाली मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे या आपल्या बाळासह विधानभवनात दाखल झाल्या होत्या मात्र त्या परत माघारी फिरल्या. पण, बाळाला ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या हिरकणी कक्षात सोयी-सुविधा नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.

“व्यवस्थेसाठी पत्र देऊनही…”

“आठ दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्ष भेटले नसल्याने प्रधान सचिवांना हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यासाठी पत्र दिलं होतं. आज, हुरूप घेऊन विधानसभेत आले होते. पण, कोणतीही व्यवस्था झाली नसल्याचं दिसत आहे. प्रचंड धूळ तेथील हॉलमध्ये आहे. अशा परिस्थितीत माझ्या आजारी बाळाला तिथे ठेऊ शकत नाही. गोळ्या देऊन बाळाला घेऊन आले आहे,” असं सरोज अहिरे यांनी सांगितलं आहे.

“आईचं पहिलं कर्तव्य फक्त बाळासाठी पाहिजे”

“आईचं पहिलं कर्तव्य फक्त बाळासाठी राहिलं पाहिजे. परंतु, नाण्याच्या दोन बाजू आहेत, एक आई तर दुसरी आमदार म्हणून. दुसरी बाजू बजावण्यासाठी आले होते. मात्र, आज मला जावं लागत आहे. या धुळीत माझ्या बाळाला ठेऊ शकत नाही. त्यांचं हिरकणी कक्ष त्यांनाच लख लाभ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राज्यातील सर्व कार्यालयांत महिलांसाठी व्यवस्था करावी,” अशी मागणी सरोज अहिरे यांनी केली आहे.

सरोज अहिरे या हिरकणी कक्षाकडे आपल्या बाळाला घेऊन जात असतांना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. मात्र, त्यावेळी हिरकणी कक्षाची स्थिती पाहता सरोज अहिरे नाराज बाहेर आल्या आणि परत माघारी निघाल्या.

“मुलाची तब्येत ठीक नसतानाही मी..”

“माझ्या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी या अधिवेशनात माझ्या लहान मुलाला घेऊन आलेले आहे. लहान मुलाची तब्येत ठीक नसतानाही मी घेऊन आले आहे. लोकप्रतिनिधींसोबत लहान मुले असतील त्यांच्यासाठी हिरकणी कक्ष सुरु करण्यात आलेला आहे. सचिवांना या संदर्भातले पत्र देखील दिले होते. मात्र हे सर्व करुनही हिरकणी कक्षामध्ये प्रचंड धूळ आहे. कक्षातील सोफे देखील फाटलेले आहेत. त्या ठिकाणी मी माझ्या बाळाला कसं ठेवणार? स्वच्छतागृहाची देखील व्यवस्था नाही. यामुळे मला पुन्हा मतदारसंघात जावे लागेल”, असे सरोज अहिरे म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-