Ajit Pawar | जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ दाव्यावर अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “राजकीय द्वेषातून…”

Ajit Pawar | पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना काही महिन्यांपूर्वी ठाण्यातील मॉलमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यावर जामीन मिळताच एका महिलेने त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. अशातच आता जितेंद्र आव्हाडांनी काल (२ फेब्रुवारी) मोठा दावा केला आहे.

‘मला कोणत्याही क्षणी अटक होईल’, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडालेली पाहायला मिळाली. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केलं आहे.

अजित पवार म्हणाले, “जितेंद्र आव्हाडांवर यापूर्वीही दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राजकारणात कधी कोण सत्तेत, तर कधी विरोधी पक्षात असतं. राजकीय द्वेषातून कधी कोणीच त्रास देऊ नये.”

“गेली ३० ते ३२ वर्ष झालं काम राजकारणात काम करतो. कधी सत्ता असताना त्या त्याचा गैरवापर करून जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न केला नाही. कायदा, नियम आणि संविधान सर्वांना समान आहे. कायदा आणि घटनेचा विचार करून सर्वांनी पुढं गेलं पाहिजे,” असं म्हणत अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं आहे.

जितेंद्र आव्हाडांचा दावा काय?

“मी धक्कादायक माहिती महाराष्ट्राला देऊ इच्छितो. केंद्रातील काही अधिकाऱ्यांनी मला सूचक माहिती दिलीय. ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्या कानावर घातलंय की, कुठल्याही परिस्थितीत तुला अटक केली जाईल. त्याचबरोबर “निदान ठाणे महापालिका निवडणूक होईपर्यंत आणि त्यानंतरचे काही महिने तुला आतमध्ये ठेवण्याचा कार्यक्रम ठरलेला आहे. तसं माझ्या विरोधात एकही केस नाही. पण ही जेव्हा बातमी येते तेव्हा आश्चर्य वाटतं”, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटल आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर नेमकं कोणत्या गुन्ह्याअंतर्गत अटक होईल, याबाबतची माहिती मात्र त्यांनी दिलेली नाही.

महत्वाच्या बातम्या :

Exit mobile version