Ramdev । स्वयंघोषित योग गुरू रामदेव आणि त्यांचे सहकारी बाळकृष्ण यांनी मंगळवारी खंडपीठासमोर प्रत्यक्ष हजर राहून जाहीर माफीनामा सादर केला.
अॅलोपॅथी उपचार पद्धतीच्या बदनामीचा कोणताही प्रयत्न करू नका असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने रामदेव आणि बाळकृष्ण यांना दिला. तसेच ‘‘तुम्ही यातून सुटलात असे समजू नका,’’ असेही त्यांना सुनावले.
आम्हाला पश्चात्ताप झाला असून आम्ही जाहीर माफी मागू इच्छितो. ही केवळ तोंडदेखली माफी नाही, हे आम्हाला न्यायालयात जाहीरपणे सांगायचे आहे, या शब्दांतील रामदेव आणि बाळकृष्ण यांचे निवेदन त्यांचे वकील मुकुल रोहतगी यांनी न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या खंडपीठापुढे सादर केले.
जाहिरातीच्या मार्गाने तुम्हाला जे करायचे आहे ते करा, आम्ही त्यावर भाष्य करणार नाही. परंतु या क्षणाला तरी त्यांची या प्रकरणातून सुटका झाली आहे, असे आम्ही म्हणू शकत नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.
करोना महासाथीच्या काळात करोनावरील लशीच्या विरोधात आणि अॅलोपॅथी उपचार पद्धतीविरोधात दिशाभूल करणाऱ्या प्रचारकी जाहिराती केल्याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने २०२२मध्ये पतंजली आयुर्वेद लिमिटेडच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. हे प्रकरण न्यायालयात असताना न्यायालयाचा आदेश डावलून आणि न्यायालयाला दिलेल्या हमीचे उल्लंघन पतंजलीने केले होते.
महत्वाच्या बातम्या