शहरातील गुंडांची झाडाझडती; ४२ पिस्तुले, ७४ काडतुसे जप्त

pune police vs gangsters

पुणे : बेकायदा देशी बनावटीची पिस्तुले बाळगणाऱ्या सराइतांविरुद्ध पुणे पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. महिनाभरात पोलिसांनी २८ गुंडांना अटक करून त्यांच्याकडून ४२ पिस्तुले जप्त केली आहेत.

जंगली महाराज रस्ता, हडपसर, नऱ्हे आंबेगाव आणि येरवडा परिसरात गेल्या आठवड्यात गोळीबाराच्या सलग चार घटना घडल्या. या घटनेत येरवड्यातील हॉटेलचालक व्यावसायिकाचा मृत्यू झाला. गेल्या सहा महिन्यांत गोळीबाराच्या वीसहून अधिक गुन्ह्यांची नोंद पोलिसांनी केली आहे.

या पार्श्वभूमीवर बेकायदा शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांतील तपास पथके आणि गुन्हे शाखेतील पथकांनी २८ गुंडांना अटक करून ४२ पिस्तुले आणि ७४ काडतुसे जप्त केली, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे, सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सिंहगड रस्त्यावर प्रशांत पवार, मेघराज उर्फ पप्पू लक्ष्मण दराडे, समीर हरिभाऊ हरपुडे यांना बेकायदा देशी बनावटीची पिस्तुले बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पाच पिस्तुले आणि काडतुसे पोलिसांनी जप्त केली. निखिल राजू शिरसाठ या तडीपार गुन्हेगाराला पकडण्यात आले. सहा पिस्तुले जप्त करण्यात आली. अश्विन बाळकृष्ण लोणारे या तडीपार गुन्हेगाराला जेरबंद केले. त्याच्याकडून तीन पिस्तुले जप्त करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.