मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या गाठीभेटी वाढल्या; वाचा कसे असणार लोकसभेचे गणित

Sanjog Waghere Vs Shrirang Barne

Sanjog Waghere Vs Shrirang Barne : मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांचा गाठीभेटींवर भर आहे. बारणे यांनी घाटाखालील रायगड जिल्ह्यातील खोपोलीत, तर वाघेरे यांनी घाटावरील देहूरोड, तळेगाव दाभाडे शहरात मंगळवारी (१६ एप्रिल) पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. दोघांनीही गाठीभेटींवर भर दिला आहे.

मावळ मतदारसंघ पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांत विभागला आहे. त्यामुळे उमेदवारांची प्रचार करताना दमछाक होताना दिसते. महायुतीकडून लढत असलेले शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी खोपोली शहरातील शिवसेना व भाजप कार्यालयांसह शहरातील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह खोपोलीत मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या. शहरप्रमुख संदीप पाटील, समन्वयक राजू गायकवाड, संघटक तात्या रिठे, भाजप कार्यालयात शहराध्यक्ष रमेश रेटरेकर, इंदरशेठ खंडेलवाल, विजय तेंडुलकर, हेमंत नांदे यांची भेट घेतली. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी खासदार बारणे यांना तिसऱ्यांदा निवडून देण्याचा निर्धार या वेळी कार्यकर्त्यांनी केला.

महाविकास आघाडीकडून लढत असलेले ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांनी देहूरोड येथील पदाधिकारी, नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. तळेगाव दाभाडे येथील व्यावसायिकांशी संवाद साधला.

पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांत विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात २५ लाख नऊ हजार ४६१ मतदार आहेत. त्यापैकी चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक पाच लाख ९५ हजार ४०८ तर पनवलेमध्ये पाच लाख ६५ हजार ९१५ मतदार आहेत. या दोन्ही मतदारसंघांत ११ लाख ६१ हजार ३२३ मतदार आहेत. निवडणुकीत दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील मतदार निर्णायक ठरणार असून मावळचा खासदार ठरविणार आहेत.

मावळ मतदारसंघातील पिंपरीत तीन लाख ६४ हजार ८०६, चिंचवडमध्ये सर्वाधिक पाच लाख ९५ हजार ४०८, मावळमध्ये तीन लाख ६९ हजार ५३४ तर पनवेलमध्ये पाच लाख ६५ हजार ९१५, कर्जत तीन लाख चार ५२३ आणि उरणमध्ये तीन लाख नऊ हजार २७५ असे २५ लाख नऊ हजार ४६१ मतदार आहेत. त्यात पिंपरी, चिंचवड, मावळमधील १३ लाख २९ हजार ७४८ तर पनवेल, कर्जत, उरणमधील ११ लाख ७९ हजार ७१३ मतदार असून, पुणे जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात एक लाख ५० हजार जास्त मतदार आहेत.

१३ लाख १० हजार ४३४ पुरुष तर ११ लाख ९८ हजार ८६८ महिला आणि इतर १५९ असे २५ लाख नऊ हजार ४६१ मतदार आहेत. २४ हजार २७८ नवमतदार असून ८५ पेक्षा जास्त वय असणारे २२ हजार ३८० तर शंभरपेक्षा जास्त वय असणारे एक हजार ३५८ मतदार आहेत.

दोन हजार ५६२ मतदान केंद्र आहेत. त्यात शहरी एक हजार ६९१ तर ग्रामीण भागात ८७१ केंद्र आहेत.

पावणेतीन लाख मतदार वाढले

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २२ लाख २७ हजार ६३३ मतदार होते. २०२४ च्या निवडणुकीसाठी आत्तापर्यंत २५ लाख नऊ हजार ४६१ मतदार आहेत. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत दोन लाख ८१ हजार ८२८ मतदारांची वाढ झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.