पुण्यात महिनाभर आधीच ‘केशर आंबा’ बाजारात

Kesar mangoes in the market

पुणे : केशर आंबा एप्रिलअखेर किंवा मे महिन्याच्या सुरुवातीस बाजारात येतो. मात्र यंदा मार्चअखेरीस केशर आंबा बाजारात दाखल झाला असून, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच तो बाजारात उपलब्ध असेल.

सांगोला, धाराशिव, मराठवाडा, खान्देशातील केशर आंबा मुंबई, पुण्याच्या बाजारात दाखल झाला आहे. केशरला १५० ते १७० रुपये किलो दर मिळत आहे. आंबा मार्चच्या अखेरीस किरकोळ प्रमाणात बाजारात आल्याची माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळांचे व्यापारी संजय पानसरे यांनी दिली.

यंदा केशरला चार-पाच टप्प्यात मोहोर आला आहे. एकाच झाडावर काढणीला आलेला, पक्व झालेला आंबा, कैरी स्वरूपातील आंबा, लिंबाच्या आकाराचा आंबा आणि नुकताच मोहरातून बाहेर येऊन लिंबोळीच्या आकाराचा आंबा दिसत आहे. पहिल्या टप्प्यातील मोहरापासून आलेल्या आंब्याची काढणी १५ एप्रिलपासून सुरू झाली आहे.

यंदा मार्चच्या मध्यापासून जूनअखेरपर्यंत केशर आंबा बाजारात असेल, अशी माहिती महाकेशर आंबा बागायतदार संघाचे अध्यक्ष डॉ. भगवानराव कापसे यांनी दिली. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार कोकणात वगळता राज्यात केशर आंबा लागवडीखालील क्षेत्र सुमारे ५३,००० हेक्टर आहे. पण प्रत्यक्षात फळ देणारी झाडे फक्त पंधरा हजार हेक्टरवर आहेत. पुरेशी काळजी न घेतल्यामुळे बाकी झाडे जळून गेली आहेत. यंदा सरासरी इतके उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

महत्वाच्या बातम्या

Exit mobile version