दुष्काळग्रस्त भागातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना शुल्कमाफी

Fee waiver for 10th and 12th students in drought affected areas

students पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) राज्यातील दुष्काळी भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी, शुल्क प्रतिपूर्ती देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार दुष्काळी भागातील बारावीचे दोन लाख ८४ हजार २०८ विद्यार्थ्यांना, तर दहावीचे तीन लाख २८ हजार ९१४ विद्यार्थी असून, दहावी आणि बारावीच्या एकूण सहा लाख १३ हजार १२२ विद्यार्थ्यांना शुल्कमाफी, शुल्क प्रतिपूर्ती मिळणार आहे.

शालेय शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला. यंदा राज्यात कमी पाऊस पडल्याने राज्यभरातील ४० तालुक्यांसह एक हजार २१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त भागातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ, शुल्क प्रतिपूर्ती करण्याची योजना आहे. त्या अनुषंगाने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांनी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधण्याबात राज्य मंडळाने विद्यार्थ्यांना, तसेच त्यासंदर्भातील कार्यवाहीबाबत शाळांना सूचना दिल्या आहेत.

दुष्काळग्रस्त भागातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शुल्कमाफी, शुल्क प्रतिपूर्तीसाठी ३२ कोटी ७ लाख ९७ हजार ४७५ रुपयांचा निधी आवश्यक असल्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाच्या योजना विभागाकडून सादर करण्यात आला होता. त्यात बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी १५ कोटी ८८ लाख २४ हजार ९२५ रुपये, तर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी १६ कोटी १९ लाख ६२ हजार ५५० कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

Exit mobile version