बार्टी, महाज्योती सारखे ‘सारथी’नेही ११ महिने विद्यावेतन द्यावे

SARTHI Candidates demand for 11 months tuition fee

SARTHI Pune : बार्टी, महाज्योती अशा अन्य संस्थांकडून ११ महिने विद्यावेतन दिले जाते. त्यानुसार छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानवविकास संस्थेकडून (सारथी) एमपीएससी उमेदवारांना देण्यात येणारे विद्यावेतन ११ महिन्यांसाठी देण्याची मागणी करण्यात आली आहे.

उमेदवारांनी या संदर्भातील निवेदने सारथीला दिली आहेत. सारथीकडून एमपीएससी प्रशिक्षणाची योजना राबवण्यात येते. त्यात निवड झालेल्या उमेदवारांना आठ महिने दरमहा आठ हजार रुपये याप्रमाणे विद्यावेतन दिले जाते. मात्र एमपीएससीची २८ एप्रिलला होणारी परीक्षा पुढे गेली आहे.

या पार्श्वभूमीवर उमेदवारांना आर्थिक आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. उमेदवारांचा पुण्यात राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उमेदवार शेतकरी कुटुंबातील आणि ग्रामीण भागातील आहेत. राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसार अन्य संस्थांप्रमाणे सारथीच्या उमेदवारांना ११ महिने विद्यावेतन देण्याची मागणी करण्यात आली आहे.

बार्टी, महाज्योती या संस्था ११ महिने दर महिन्याला १० हजार रुपये दिले जातात. सारथीकडून आठ महिने विद्यावेतन मिळाले. मात्र अन्य संस्थांच्या धर्तीवर सारथीकडून ११ महिने विद्यावेतन देण्याची मागणी गेल्या वर्षभरापासून करत आहोत. मात्र आतापर्यंत केवळ आश्वासने देण्यात आली. आता २८ एप्रिलची परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे गेल्याने अडचणी निर्माण झाल्याचे भरत सोळंकी या उमेदवाराने सांगितले.

दरम्यान, विद्यार्थ्यांची मागणी विचारात घेऊन शासनाला प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी स्पष्ट केले.

SARTHI Candidates demand for 11 months tuition fee

महत्वाच्या बातम्या

Exit mobile version