वर्षभरात २८ हजार घरे महिलांच्या नावावर मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलतीचा लाभ

Benefit of one per cent discount on stamp duty

Stamp duty पुणे : महिलेच्या नावे सदनिका खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत राज्य सरकारकडून देण्यात येते. त्यानुसार सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात २८ हजार ९४२ महिलांनी या सवलतीचा फायदा घेतला आहे. राज्यात सर्वाधिक लाभ पुण्यातील ९९३८ महिलांनी घेतला असून, त्या खालोखाल मुंबई उपनगरमधील ५६८७ महिलांनी या सवलतीचा लाभ घेतला असल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.

गेल्या वर्षभरात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने या सवलतीपोटी तब्बल २०२.१४ कोटी रुपयांची मुद्रांक शुल्क माफी दिली आहे.

दरम्यान, ही सवलत घेतल्यानंतर सदनिका खरेदी केल्यापासून १५ वर्षांपर्यंत त्या सदनिकेची विक्री करता येणार नाही. तसेच अशा सदनिकांची विक्री केवळ महिलांनाच करता येईल, या अटी राज्य सरकारने गेल्या वर्षी शिथिल केल्याने या सवलतीचा फायदा अनेक महिलांनी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

महिलेच्या नावे सदनिका खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत देण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सन २०२१ मध्ये सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात केली होती. केवळ सदनिका खरेदीसाठी आणि महिलेच्या एकटीच्या नावेच सदनिका खरेदी होत असल्यास ही सवलत देण्यात येते. मोकळा भूखंड किंवा सदनिका खरेदी करताना प्रथम महिलेचे नाव, पतीचे किंवा अन्य पुरुषाचे नाव असल्यास सवलत देण्यात येत नाही. या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीपुरती मर्यादित ठेवण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही ही सवलत कायम ठेवण्यात आली आहे.

याबाबत नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे सह महानिरीक्षक नंदकुमार काटकर म्हणाले, की महिलांच्या नावे सदनिका खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत देण्यात येते. त्यानुसार सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात २८ हजार ९४२ दस्त नोंदविण्यात आले. त्यापोटी १०७९ कोटी ७५ लाख ४५ हजार १६२ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क मिळणे अपेक्षित होते. मात्र, एक टक्का सवलत असल्याने २०१ कोटी १४ लाख ३१ हजार २३२ कोटी रुपयांची मुद्रांक शुल्क माफी देण्यात आली.

मुद्रांक शुल्कात महिलांनी घेतलेल्या सवलतीचा आढावा

पुणे शहर आणि ग्रामीण ९९३८, ठाणे शहर आणि ग्रामीण ६५९३, मुंबई उपनगर ५६८७, रायगड १४८९, मुंबई १२६१, नागपूर शहर आणि ग्रामीण ७७६, पालघर ५४१, छ. संभाजीनगर ५१६, सातारा ४३१, नाशिक ३९६, सांगली २०९, नगर १६१, लातूर १५९, कोल्हापूर १५५, जळगाव १४२, सिंधुदुर्ग ७१, सोलापूर ६५, हिंगोली ६५, नंदूरबार ५७, यवतमाळ ४२, बीड ३७, जालना ३३, अकोला २९, परभणी २१, रत्नागिरी १५, धुळे १४, नांदेड ९, वाशिम ८, बुलडाणा ७, गडचिरोली ४, अमरावती ३, चंद्रपूर ३, धाराशिव २, गोंदिया २, वर्धा १

महत्वाच्या बातम्या

Exit mobile version