झी मराठी व निलेश साबळे, तुम्हाला लाज वाटतेय का.? वाटायलाच पाहिजे.!

जगदीश ओहोळ – एकदा कोल्हापुरात एका नाटकाचा खेळ सुरू होता. नाटक सुरू झालं आणि नाटकातील छत्रपती शिवाजी महारांजांची भूमिका करणाऱ्या तरुणाने प्रवेश केला. छत्रपतींची भूमिका करणाऱ्या त्या तरूणाला एका भारदस्त व्यतीने लवून मुजरा केला. ती मुजरा करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोण नव्हती. ते होते स्वतः कोल्हापूरचे राजे राजर्षी शाहू महाराज..! ते कलासक्त होते. आपल्या राज्यातील कलाकारांना ते राजाश्रय देत. ते कुस्त्यांचे चाहते होते. आजही कोल्हापूरात उत्तम मल्ल तयार होतात ती, महाराजांनी दिलेली देणगी आहे.

साबळे व त्यांचे सहकारी अशा महान राजांची तुम्ही थुकरट विनोदासाठी अशी नक्कल करून विटंबना करता आहात. हे दोन्ही राजे, कला आणि कलाकाराची प्रचंड कदर करणारे राजे होते. तुमच्या सारख्या कलाकारांना त्यांनी त्या काळात जपलं आणि पोसलं म्हणून या कला जिवंत आहेत आणि साबळे, कदम, साने असे कलाकार हसत हसत जीवन जगत आहेत.

छत्रपती शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या विचारांची व कर्तुत्वाची उंची एवढी आहे की आजच तुमचं सुखी आयुष्य ही या महापुरुषांची देण आहे हे याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. अशा थुकरट कार्यक्रमात विनोदासाठी त्यांचं नाव वापरताना तुम्हाला लाजा वाटल्या नाहीत का.? हसताय का.? हसलेच पाहिजे . या ऐवजी साबळे, लाजताय का.? तुम्हाला लाज वाटलीच पाहिजे .! असं म्हणण्याची वेळ पुरोगामी महाराष्ट्रावर आली आहे.

त्यांच्या कर्तृत्वाची उंची अत्यंत मोठी आहे. त्यांच्या फोटो चा वापर फोटोशॉप करून विनोदासाठी कोणी करत असेल तर त्याची मानसिकता ही कुजकी व सडकी आहे असे म्हणावे लागेल. झी टीव्ही व चला हवा येऊ द्या यांचा पुरोगामी महाराष्ट्र जाहीर निषेध करतो आहे. कोल्हापुरात जाऊन राजांच्या पुतळ्यासमोर त्यांनी तात्काळ माफी मागावी.

(लेखक जगदीश ओहोळ सामाजिक चळवळीतील व्याख्याते आहेत. सदर लेखामध्ये व्यक्त केली गेलेली मतं ही लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.) 

हेही पहा –