झायरा वसीम छेडछाड : आरोपीला २२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई : अभिनेत्री झायरा वसीमशी विमान प्रवासात गैरवर्तन करणा-या आरोपी विकास सचदेवला २२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दिंडोशी सत्र न्यायालयात आज यावर सुनावणी झाली. दरम्यान विकासने जामिनासाठीही अर्ज केला असून या अर्जावर १५ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

शनिवारी विस्तारा एअरलाईन्सच्या विमानातून दिल्ली-मुंबई प्रवास करताना मागील सीटवर बसलेल्या विकासने छेडछाड केल्याचा आरोप झायरा वसीमने केला आहे. तिच्या तक्रारीवरून सहार पोलिसांनी विकासला अटक केली होती.

त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्या १३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्याची पोलीस कोठडी संपणार असल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.