fbpx

पुणे: मधल्या सुट्टीत 12 विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या नराधम शिक्षकाला अटक

पुणे : जिल्हा परिषदेच्या शाळेतील तब्बल 12 विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. गुरु-शिष्यांच्या नात्याला काळिमा फासल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

इयत्ता सहावीत शिकणाऱ्या तब्बल १२ मुलींचा लैंगिक छळ करणाऱ्या या नराधम ४२ वर्षांच्या शिक्षकाला विमानतळ पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने १८ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित व्यक्ती लोहगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहे. विक्रम पोतदार असे या व्यक्तीचे नाव असून हा नराधम शिक्षक पुण्याच्या लोहगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तो शाळेतील विद्यार्थिनींचा विनयभंग करत होता. मधल्या सुट्टीत विद्यार्थिनींना बोलावून तो त्यांची छेड काढायचा, अश्लील चाळे करायचा असा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. तसेच ही बाब विद्यार्थिनींनी कुणालाही सांगू नये यासाठी विक्रम त्यांना धमकवायचा, असेही विद्यार्थिनींनी सांगितले.

भारतीय दंडविधान संहितेतील कलम ३५४ (लैंगिक छळ), कलम ५०६ (गुन्हेगारी हेतू) नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिक्षकाविरुद्ध लहान मुलांसाठीच्या पॉक्सो कायद्यातील तरतुदींनुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानतळ पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक सी. एस. चौधरी या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. पुणे शहरातील पोलिस उपायुक्तही या तपासावर लक्ष ठेवून आहेत.