वाघ सुस्तावले;नकारात्मक वातावरणामुळे युवासेनेमध्ये मरगळ

पुणे/दीपक पाठक : लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येवून ठेपल्या आहेत. प्रत्येक पक्ष या निर्णायक लढाईसाठी सज्ज होत आहे. अंतिम विजय मिळविण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून राजकीय पक्षांच्या सर्व विंग्स सक्रीय झाल्याचं चित्र आहे. मात्र युवकाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पुण्यातील युवासेनेमध्ये मोठ्याप्रमाणावर मरगळ आल्याचं चित्र आहे.बाळासाहेबांचा जन्म ज्या पुण्यात झाला त्याच ठिकाणी युवा सेनेची अत्यंत दयनीय अशी अवस्था आहे.

पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्याप्रमाणावर समस्यांचा सामना करावा लागतो. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आक्रमकपणे भूमिका घेणारी युवासेना सध्या थंड झाल्याने आता इतर विद्यार्थी संघटना युवासेनेपेक्षा सरस ठरत आहेत. किरण साळी यांनी अध्यक्षपदी असताना विविध उपक्रम राबवून युवासेनेला जिवंत ठेवले मात्र सध्या कोणतेही नवीन उपक्रम राबविले जात नसल्याने युवक या संघटनेपासून दूर जाऊ लागले आहेत.

नोव्हेंबर महिन्यात पुणे शहर युवासेनेच्या अध्यक्षपदी असणारे किरण साळी यांचं प्रमोशन झालं. त्यांच्यावर शिवसेनेच्या उपशहर प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली तेव्हापासून युवासेनेचे अध्यक्षपद रिक्तच आहे. आदित्य ठाकरे हे पुण्यासाठी वेळ देत नसल्याचं बोललं जात असून पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये नैराश्य आल्याचं चित्र आहे. दरम्यान,मागे युवासेनेच्या राज्य कार्यकारीणीच्या ज्यावेळी नियुक्त्या करण्यात आल्या होत्या त्यावेळी देखील घराणेशाहीचा आरोप झाला होता. तेव्हापासून युवासेनेत नकारात्मक वातावरण तयार झाले आहे ते आजतागायत तसेच आहे.

गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत युवासेनेने जी मेहनत घेतली त्याच्या जोरावरच शिवसेनेला मोठ यश प्राप्त झालं होतं. यंदा हे असं वातावरण असल्याने याचा थेट फटका शिवसेनेच्या उमेदवारांना बसणार आहे. यासंदर्भात आम्ही किरण साळी यांच्याशी संपर्क साधला असता, सध्यातरी पुण्यात शहराध्यक्षाची निवड होण्याची शक्यता नसल्याचं म्हटलं आहे.मुंबईच्या धर्तीवर पुण्यात देखील वार्ड प्रमुखांना,विभागप्रमुखांना,पदाधिकाऱ्यांना ताकत दिली जाईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.असे असले तरीही आता नव्या अध्यक्षाची नेमणूक लवकरात लवकर केली जावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.