fbpx

आदित्य ठाकरेंचा अपमान करणाऱ्या महाजनांचा प्रचार करणार नाही ; युवासेनेची टोकाची भूमिका

टीम महाराष्ट्र देशा : आमच्यात मतभेद होते पण आता आमचं मन जुळलं आहे असं सांगत भाजपाध्यक्ष अमित शाह यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन गांधीनगरमधील मतदारांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्याआधी शक्तीप्रदर्शन करण्यासाठी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. यासभेला संबोधित करताना ठाकरे यांनी एन. डी. ए. पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास देखील व्यक्त केला.

आमच्यात मतभेद होते पण आता आमचं मन जुळलं आहे हा उद्धव ठाकरेंचा दावा किती चुकीचा आहे हे दाखविणारी आणखी एक घटना समोर आली आहे. उत्तर मध्य मुंबईच्या भाजप उमेदवार पूनम महाजन यांच्या बॅनरवर आदित्य ठाकरे यांचा फोटो नसल्याने युवासेना नाराज आहे याच मुद्द्यावरून युवासेना आणि पूनम महाजन यांच्यात वाद सुरु आहे.

आदित्य ठाकरे हे देशाचे युथ आयकॉन आहेत. त्यांचा अपमान हा आम्हा शिवसैनिकांचा अपमान आहे. त्यामुळे पूनम महाजन चूक मान्य करेपर्यंत भाजपच्या प्रचारावर बहिष्कार टाकत आहोत अशी टोकाची भूमिका युवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

दरम्यान, ठाकरे यांनी आमच्यातील मतभेद दूर झाले असल्याचे जरी सांगितले असले तरी, प्रत्यक्षात मात्र काही वेगळचं चित्र पहायला मिळत आहे. राज्यातील ४८ जागांवर शिवसेना भाजपने युती केली असली तरी, बंगालमधील १५ जागांवर शिवसेना स्वबळावर लढणार आहे. फक्त बंगालच नव्हे तर, असचं काहीसं चित्र गोव्यात देखील पहायला मिळत आहे.