मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक बंडखोर आमदार आसामची राजधानी गुवाहाटी येथे तळ ठोकून आहेत. आमदारांच्या बंडखोर वृत्तीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चिंता वाढली आहे. उद्धव ठाकरे यांनी सरकारी वर्षा बंगला सोडला आणि वडिलोपार्जित घर मातोश्रीवर स्थलांतरित झाले. गुवाहाटीत शिंदे गटात सामील झालेले आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत गंभीर आरोप केले होते. मुख्यमंत्री वेळ देत नाहीत, नीधी देत नाहीत, असा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर शिवसैनिकांनी एक पत्र प्रसिद्ध करत संजय शिरसाट यांना जशात तसे उत्तर दिले होते. दरम्यान शिरसाट यांच्या मतदार संघातील युवासेनेचे शहर उपप्रमुख अजय चोपडे यांनी गंभीर इशारा दिला आहे.
आमदार संजय शिरसाट यांनी मुंबईत, औरंगाबादेत येऊन दाखवावे. त्यांना शिवसेना स्टाईलने हिसका दाखवला जाईल, असा इशारा आमदार संजय शिरसाट यांच्या मतदार संघातील युवासेनेचे शहर उपप्रमुख अजय चोपडे यांनी दिला आहे.
“संजय शिरसाठ म्हणतात आम्हाला गद्दार म्हणू नका. मुख्यमंत्री वेळ देत नाहीत. त्यांना वर्षाचं दार अडीच वर्षात पहिल्यांदा उघडं दिसलं. आम्हाला विकास निधी मिळत नाही. मग सातारा देवळाईत झालेला विकास शिरसाट यांनी घरच्या जमीनी विकून केला का? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन शिरसाट फोटोसेशन करतात अन् म्हणतात मुख्यमंत्री वेळ देत नाहीत. तुमच्याच बंड करायची ताकद आहेत तर संभाजीनगरमध्ये येऊन दाखवा,” असा इशारा अजय चोपडे यांनी दिला आहे.
काय म्हणाले होते संजय शिरसाट?
शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव यांना लिहिलेल्या पत्रात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी लिहिले आहे की, आमच्या समस्या फक्त एकनाथ शिंदे ऐकत असत. वर्षा बंगल्यावर पहिल्यांदाच लोकांची गर्दी पाहून आनंद झाला. गेली अडीच वर्षे आम्हाला प्रवेश मिळत नव्हता. या बंगल्यात प्रवेश करण्यासाठी आपल्या जवळच्या लोकांना नवस करावा लागला. तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी आम्हाला राज्यसभा निवडणुकीपासून दूर ठेवले. आम्हाला अपमानास्पद वागणूक मिळाली. आम्हाला काही अडचण असेल तर आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटायचे होते पण आम्हाला वर्षा निवास येथे बोलावून अनेक तास रस्त्यावर उभे केले जायचे. आमचा फोनही कोणी घेत नव्हत. हे सर्व आमदारांनी सहन केले आहे. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सांगण्याचा आम्ही अनेकदा प्रयत्न केला. या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या नसतील, मी सहमत आहे. पण आमचा अपमान होत असताना आम्हाला हे सांगायचे होते. एकनाथ शिंदे आमचे सर्व बोलणे ऐकत असत. आम्ही सर्व न्यायासाठी एकत्र आलो आहोत.
महत्वाच्या बातम्या :