कौमार्य चाचणी प्रथे विरोधात आवाज उठविणा-या तरुणांना बेदम मारहाण

पिंपरी चिंचवड : कंजारभाट समाजातील नववधूची कौमार्य चाचणी या अनिष्ट प्रथेविरुद्ध व्हॉट्स अपच्या माध्यमातून आवाज उठविणा-या तरुणांना समाजातीलच अन्य तरुणांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी प्रशांत अंकूश टिंबरेकर (वय 25, रा. येरवडा), याने पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार पाच जणांसह त्यांच्या अन्य 40 साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कंजारभाट समाजात लग्नानंतर नववधूची कौमार्य चाचणी घेण्याची अनिष्ट प्रथा आजही समाजात कायम आहे. या समाजात लग्नाच्या पहिल्या रात्री मुलीची कौमार्याची चाचणी केली जाते. प्रथेला समाजातीलच काही तरुणांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आवाज उठवला आहे. यासाठी तरुणांनी # Stop The "V"Ritual या नावाने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे.

प्रशांत इंद्रेकरसह त्याचे काही मित्र या ग्रुपचे सदस्य आहेत. ही प्रथा बंद व्हावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या मोहिमेला अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही पाठिंबा दिला आहे. मात्र त्यांचं हे कृत्य त्यांच्याच समाजातील अन्य तरुणांना पटलं नाही.

दरम्यान, आरोपी सनी मलके याच्या बहिणीचा विवाह होता. फिर्यादी प्रशांत व त्याचे मित्र सौरभ आणि प्रशांत तामचिकर यांना लग्नाचे निमंत्रण देऊन सनी याने बोलावले होते. काल (दि.21) रात्री हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी प्रथेनुसार नंतर जातपंचायत भरली. जात पंचायत संपल्यानंतर प्रशांत हा आपल्या आई व बहिणीला घेण्यासाठी लग्न मंडपात गेला असता तिथे आरोपी सनी व त्याचे साथीदार हे सौरभ मछले याला मारहाण करीत होते. तुम्ही कौमार्य प्रथेविरुद्ध आवाज उठवून जात विरोधी कृत्य करीत आहात असे म्हणत त्याला मारहाण सुरू होती. कौमार्य प्रथेविरुद्ध आवाज उठवून, टीव्हीवर बातम्या देऊन तुम्ही समाजाची बदनामी करत आहात असं म्हणत मारहाण सुरु होती. यानंतर प्रशांत आणि त्याचा आणखी एक मित्र दुसऱ्या मित्राला सोडवायला गेले. परंतु आरोपी सनी मलके आणि त्याच्या साथीदारांनी प्रशांतलाही मारहाण केली.यामध्ये सौरभ मछले याची सोन्याची चैन आणि घड्याळ चोरीला गेले आहे .

याविरोधात प्रशांत टिंबरेकर याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी सनी मलके विनायक मलके, अमोल भाट, रोहित रावळकर, मेहूल तामचिकर त्यांचे अन्य 40 साथीदार यांच्या विरोधात कलम 143,147, 149, 323, 506, 427 अंतर्गत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहे.