समाजाचे देणे लागतो या भावनेने युवकांनी कार्य करावे – डॉ. प्रकाश आमटे

Dr.Prakash-Amte

पुणे  : आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना एक समाज म्हणून आपल्या सर्वांच्याच मनात असायला हवी. आज ही भावना मनात ठेवत अनेक तरुण कार्यरत आहेत, याचा आम्हाला आनंद आहे. मात्र ही संख्या आणखी वाढायाला हवी असे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.

अथश्री फाउंडेशनच्या वतीने डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे आणि कसोटीपटू चंदू बोर्डे यांचा प्रतापराव पवार यांच्या हस्ते ‘जीवनगौरव पुरस्कार’ देत गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रम प्रसंगी परांजपे स्कीम्स कन्सट्रक्शन्स लिमिटेडचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे, व्यवस्थापकीय संचालक शशांक परांजपे, अथश्री फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक सुदेश खटावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कारानंतर निवेदक अभय गोखले यांनी डॉ. आमटे दांपत्य आणि चंदू बोर्डे यांची प्रकट मुलाखत घेतली. डॉ. आमटे म्हणाले की, घरात बाबांमुळे समाजसेवेचे बाळकडू मिळाले होतेच त्यामुळे आम्ही त्याकडे नैसर्गिकरित्या ओढले गेलो. सुरुवातीला परिस्थितीशी दोन हात करताना मनात भीती असायची पण आपण जे काम करीत आहोत त्याची गरज आणि गांभीर्य लक्षात आल्यानंतर आमच्याकडून ते आपोआप होत गेले. हे काम आम्ही ज्यांसाठी करीत आहोत त्यांनी आमच्यावर दाखविलेला विश्वास हा आमच्यासाठी महत्त्वाचा ठरला असे डॉ. मंदाकिनी आमटे यांनी सांगितले.

विटी – दांडू आणि लगोरी या खेळांमुळे खरेतर मी क्रिकेटकडे वळालो आणि क्रिकेट पाहाता पाहाता ते अंगात कधी भिनलं कळलच नाही अशा शब्दांत चंदू बोर्डे यांनी आपला प्रवास कथन केला. भारताच्या क्रिकेट निवड समितीचा भाग असताना सुनील गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडूलकर, श्रीकांत आणि अझरुद्दीन यांसारखे चांगले कर्णधार आणि खेळाडू देशाला देऊ शकलो याचे समाधान मला नेहमीच राहील असेही त्यांनी यावेळी नमूद केले.