चंदुभैया परदेशी व मित्रपरिवाराने आयोजित केलेल्या चर्चा सत्राला युवकांचा अभूतपूर्व प्रतिसाद 

निवडणूका व विकासाच्या मुद्द्यावर गाजले चर्चासत्र 
नसरापूर, ता. भोर- जिल्हा परिषद व पंचायत समितिच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेळू-भोंगवली गटातील विविध सामाजिक समस्या व झालेल्या विकासकामांचा उहापोह करण्यासाठी नसरापूर येथे चंदुभैया परदेशी व मित्रपरिवाराने युवकांसाठी चर्चासत्राचे आयोजन केले होते.या चर्चासत्रात वेळू-भोंगवली गटातून अडीच ते तीन हजार युवकांनी सहभाग घेतला.या चर्चासत्रात युवकांनी आपआपल्या गावात झालेली विविध विकासकामे,त्या कामांचा दर्जा तसेच विविध विकासकामे होणे अपेक्षा व्यक्त केल्या.आपल्या गावच्या विकासात जेष्ठ नागरिकांसोबतच तरुणांचा देखील सहभाग असतो. त्यांच्या सहभागानेच गावातील समस्या सोडवता येतात. नागरिकांसाठीच्या आवश्यक मूलभूत सोयी-सुविधांची जाणीव तेथील ग्रामस्थांना असते. हि जाणीव मनात ठेऊन गावकरभारी व लोक प्रतिनिधी यांच्यामध्ये महत्वाचा दुवा म्हणजे जागृक युवक असतात. काही वेळेस लोकप्रतिनिधी व गावकरभारी काही समस्यांकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करतात. अशा वेळेस जागृक युवक प्रशासनाकडे अर्ज विनंत्यांच्या माध्यमातून लक्ष वेधतात. पर्यायाने अशा जागृक युवकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे अशी मागणी युवकांची होती ती चंदुभैया परदेशी यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली.
भोर तालुक्यात प्रथमच अशा चर्चासत्राचे आयोजन
चंदुभैया परदेशी मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि वेळू-भोंगवली गटातून युवकांसोबत गावागावातून फिरताना आजही लोकांना मूलभूत सुविधांपासून वंचित असताना दिसत आहे. रस्ता, पिण्याच्या पाण्याची समस्या, सांडपाणी, कचरा, सार्वजनिक विजेची सुविधा, प्रवासाच्या सुविधा, शिक्षणाच्या सुविधा, रोजगार अद्याप पूर्ण झालेल्या नाहीयेत. गेली साठ वर्ष याच मुद्यावर निवडणूक लढवत आहेत. वंश परंपरागत निवडणूका झाल्या असून लोकशाही केवळ नावालाच राहिली आहे, मग नवीन नेतृत्वाला संधी कधी मिळणार म्हणून आगामी निवडणुकीत युवकांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. सुशिक्षित तरुण युवकांना, महिलांना स्थानिक ठिकाणीच रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी उद्योग केंद्र उभारून मार्गदर्शन करणार आहेत. विकासाचा भक्कम पाया उभारण्यासाठी तरुण युवक पुढे सरसावले पाहिजेत. एक आदर्श ग्रामव्यवस्था तयार केली पाहिजे.
या कार्यक्रमासाठी वेळू-भोंगवली गटातून अनेक युवकांनी आपल्या गावच्या विविध समस्या प्रश्नातून मांडल्या. या समस्यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवनाना कोंडे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती बाळकृष्ण दळवी यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
नेत्यांनी भाषणे द्यायची आणि कार्यकर्त्यांने ऐकायचे या संकल्पनेला डावलून चंदुभैया परदेशी यांनी युवकांसाठी जे व्यासपीठ निर्माण करून दिले त्याचा फायदा युवकांनी आपल्या समस्या समोर मांडून घेतला. 
ज्या समस्या मांडल्या गेल्या त्यांचा संक्षिप्त आढावा खालीलप्रमाणे 
पारवडी : पारवडी येथील युवकांनी गावात १०-१५ वर्षांपासून चालू असलेल्या दारू धंद्यामुळे गावकऱ्यांना त्रास होत आहे असा सवाल केला. या धंद्यामुळे तरुण युवक वाईट व्यसनाकडे जात आहेत व त्यांच्या कुटुंबाची हानी होत आहे तरी याबद्दल काय उपाय कराल असा प्रश्न पारवडीतील युवकांनी केला.
यावर उत्तर देताना भालचंद्र जगताप यांनी  १५ दिवसांमध्ये दारूधंदा बंद करू यामध्ये तुमच्या स्थानिक लोकांचा देखील सहभाग गरजेचा आहे असे आश्वासन त्यांनी दिले.
निगडे : निगडे येथील क्रेशर खाण गेली कित्येक वर्षे चालू आहे हि खाण गावालगत असल्यामुळे गावातील ४०-५० घरांना तडे गेले आहेत असे युवकांचे म्हणणे आहे तरी या संदर्भात काय उपाय कराल असा सवाल निगडे गावच्या युवकांनी केला. या प्रश्नावर उत्तर देताना मान्यवरांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून तो प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले.
कुसगाव : आदित्य गायकवाड या तरुणाने तलाठी कार्यालयातील ऑनलाइन कारभारामुळे होणाऱ्या त्रासाला वाचा फोडली. तलाठी कार्यालय जास्तकरून बंद असते आणि जेव्हा चालू असते तेव्हा तांत्रिक बिघाडामुळे दाखले मिळत नाहीत. ज्याचा परिणाम शाळकरी मुलांना मिळणाऱ्या सवलतींवर होतोय याकडे आदित्य ने मान्यवरांचे लक्ष्य वेधले.
यावर आम्ही  सरकारला निवेदन देऊ व त्याचा पाठपुरावा करू असे आश्वासन मान्यवरांनी दिले.
शिवरे : येथे एका तरुणीला कर्नाटकातील लोकांनी मारहाण केली व तिच्यावरच गुन्हा दाखल केला आहे तेव्हा आपल्या भागातील मुली-स्त्रिया सुरक्षित आहेत कि नाही असे शिवरे येथील युवकाने विचारले. यावर योग्य ती कारवाई केली जाईल आणि यापुढे असे प्रकार  होणार नाहीत असे आश्वासन मान्यवरांनी दिले.
निगडे : येथील युवकांनी सौरदिव्यांचा प्रश्न उपस्थित केला, सरकारी दिवे लावले तर त्याच्या बॅटरी चोरीला जाणे, गरजेच्या ठिकाणी दिवे न लावता केवळ पुढाऱ्यांच्या घरासमोर लावले जातात असे येथील युवकांचे म्हणणे होते. सौरदिव्यांच्या बॅटरी चोरांना आळा घालण्यात येईल अशी ग्वाही मान्यवरांनी यासंदर्भात दिली.
पांडे : या गावच्या युवकांनी एस.टी. संदर्भात प्रश्न केला. एस.टी. ची सुविधा जरी उपलब्द असली तरी येणारी बस अगोदरच भरून येत असल्याने जागा मिळत नाही व त्यामुळे लोकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. ज्यादा बस चालू करायचा प्रयत्न करू अशी ग्यावी  मान्यवरांनी  दिली.
कुरंगवाडी : येथील युवकांनी पाण्याचा विषय पुढे केला युवकांच्या मते आपल्या भागातील गुंजवणी-शिवगंगा नद्यांचे पाणी प्रथम आपल्या भागातील शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे आणि तो त्यांचा हक्क आहे असे सांगितले.
न्हावी :  न्हावी  ग्रामस्थांनी शेतातून शेतीमाल वाहून आणताना रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना होणाऱ्या व्यथा मांडल्या. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना हातपाय जोडून शेतीमाल बाहेर काढावा लागतो यावर काहीतरी उपाय करावा अशी विनंती त्यांनी केली.
नसरापूरससेवाडी गावातील युवकांनी राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना होणाऱ्या अपघातांचा मुद्दा मांडला व हा महामार्ग १० वर्षे झाली  तयार करत आहेत.  याबाबत लवकर काहितिरी उपाय करावा असे आवाहन नसरापूर व ससेवाडी येथील युवकांनी केले.
याप्रकारे बऱ्याच युवकांनी आपल्या भागातील, गावातील प्रश्न मांडले.
अशा प्रकारचे भोर तालुक्यातील हे पहिलेच चर्चासत्र पहायला मिळाले, जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठाची गरज होती.  या शब्दांत मान्यवरांनी चंदुभैया परदेशी यांचे कौतुक केले. 
या कार्यक्रमासाठी भोर-वेल्हा-मुळशीचे युवा नेते विक्रमदादा खुटवड, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रकांत बाठे, गणेश बागल, सिद्धार्थ टापरे, संतोष शिळीमकर, नंदुकाका कोंडे, माउली पांगारे आदी मान्यवरांनी हजेरी लावली. त्यामुळे हे चर्चासत्र युवकांच्या लक्षात राहील असे युवकांनी बोलताना सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवनाना कोंडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्र संचालन विठ्ठल पवार व नागेशजी तनपुरे यांनी करून उपस्थितांचे आभार भालचंद्र जगताप यांनी मानले. ( वार्ताहर नसरापूर )